मुंबई- ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटावरून बराच मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखविण्यात आला आहे, असा आरोप होतोय. काही संघटनांनी या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात कायदेशीर नोटीस बजावली होती. सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात चित्रपटाविरोधात आंदोलन केलं आणि थिएटरमध्ये सुरू असलेला शो बंद पाडला.
मूळ इतिहासाला अनुसरून चित्रपटातील दृश्ये दाखवली गेली नाहीत, असा आरोप विविध संघटनांनी त्यांच्या नोटिशीत केला आहे. सिनेमॅटिक लिबर्टीवरूनही बरेच आरोप केले आहेत. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साम्राज्याला मराठी साम्राज्य म्हटलं गेलंय. मात्र ते मराठा साम्राज्य आहे.
ज्या संघटनांनी नोटीस पाठवली आहे, त्यात संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र, मराठा सेवा संघ आणि ऑल इंडिया शिवजयंती महोत्सत्व समिती यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व भाषांचं ज्ञान होतं, मात्र त्यांना फक्त मराठी भाषेप्रती प्रेम होतं असं या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असं त्याचं म्हणणं आहे. याशिवाय त्यांचा असाही आरोप आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, तेव्हा बाजीप्रभू देशपांडे तिथे उपस्थित नव्हते. मात्र चित्रपटात त्यांची उपस्थिती दाखवली गेली आहे.
हर हर महादेव या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेनं छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. अभिजीत देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सुबोध आणि शरदशिवाय यामध्ये अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे यांच्याही भूमिका आहेत. दिवाळी मुहूर्तावर 25 ऑक्टोबरला हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये भारतभरात प्रदर्शित झाला.