श्रावणात भगवान शंकरावरील एक गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. ‘हर हर शंभू’ (Har Har Shambhu) हे गाणं आजसुद्धा अनेकांच्या मोबाइलमध्ये रिंगटोन म्हणून वाजतं. या गाण्यावरून वादसुद्धा झाला होता. सोशल मीडियावर गाजलेल्या या गाण्याची गायिका अभिलिप्सा पांडा (Abhilipsa Panda) होती. शंकरावरील लोकप्रिय गाण्यांच्या यादीत आजही या गाण्याचा उल्लेख केला जातो. आता तीच गायिका पुन्हा एकदा नवीन गाणं श्रोत्यांच्या भेटीला आणत आहे. नवरात्रीनिमित्त (Navratri) अभिलिप्सा देवीवरील नवीन गाणं प्रदर्शित करणार आहे.
‘नव दुर्गे नमो नम:’ असं या गाण्याचं नाव आहे. नुकतंच अभिलिप्साने या गाण्याचा पोस्टर प्रदर्शित केला आहे. हर हर शंभूच्या तुफान लोकप्रियतेनंतर चाहत्यांना तिच्या या गाण्याची फारच उत्सुकता आहे.
अभिलिप्सा ही मूळची ओडिशाची राहणारी आहे. तिचे वडील निवृत्त लष्कर अधिकारी आणि आई शिक्षिका आहे. गायनक्षेत्रात करिअर करण्यासाठी अभिलिप्साला तिच्या आईवडिलांनी नेहमीच मदत केली. अभिलिप्साचे आजोबा पश्चिम ओडिशातील प्रसिद्ध कथाकार होते. तिथल्या परिसरात ते उत्तम हार्मोनियम वाजवण्यासाठी लोकप्रिय होते.
अभिलिप्साने वयाच्या चौथ्या वर्षापासून आजोबांकडून संगीत शिकण्यास सुरुवात केली. अभिलिप्साची छोटी बहीणसुद्धा गायनक्षेत्रात कार्यरत आहे. अभिलिप्सा ही उत्तम गायिका तर आहेच, पण त्याचसोबत ती उत्तम शास्त्रीय ओडिसी नृत्यांगनासुद्धा आहे.
इतकंच नव्हे तर मार्शल आर्ट आणि कराटेमध्येही ती पारंगत आहे. कराटेमध्ये तिला ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. 2019 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील कराटे चॅम्पियनशिपमध्ये अभिलिप्साने सुवर्णपदक पटकावलं होतं.