बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ ही वेब सीरिज अखेर 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. सीरिजची कथा लाहोर याठिकाणी असलेल्या हीरामंडी आणि तेथील सुंदर महिलांच्या आयुष्याभोवती फिरताना दिसत आहे. एक काळ असा होता जेव्हा नवाब यांच्यामुळे हीरामंडीला अधिक महत्त्व प्राप्त झालं होतं. भन्साळी यांनी वेब सीरिजसाठी वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरणा घेतली. असे म्हणतात की हिरामंडीच्या अनेक कथा प्रत्यक्षात सत्य आहेत. यामधील एका महिलीची कहाणी… त्या महिलेचं नाव निग्गो असं होते. तर आज अशाच एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेबद्दल जाणून घेऊ…
पाकिस्तान येथील लाहोर याठिकाणी लॉलीवूड आहे, जेथे एकेकाळी हिरामंडीचं राज्य होतं. फाळणीनंतर हा पंजाबी आणि उर्दू भाषेतील सिनेमे निर्माण करणारा एक भाग बनला. तेव्हा अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी हिरामंडी येथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. 60 व्या दशकातील गोष्ट आहे, जेव्हा नर्गिस बेगम उर्फी निग्गो यांनी स्टार म्हणून ओळख मिळवण्यासाठी हीरामंडीचा त्याग केला.
निग्गो यांनी आपल्या नृत्य कौशल्यामुळे अनेकांच्या मनावर राज्य केलं आणि सर्वात महागडी आयटम गर्ल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. निग्गो यांनी 100 पेक्षा अनेक सिनेमांमध्ये काम केलं. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इशरत’ सिनेमातून निग्गो यांनी झगमगत्या विश्वात पदार्पण केलं.
1971 मध्ये ‘कासू’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान निग्गो यांची ओखळ निर्माते ख्वाजा मजहर यांच्यासोबत झाली. पहिल्या ओळखीनंतर दोघांचा एकमेकांवर जीव जडला आणि दोघांनी लग्न केलं. पण निग्गो यांच्या आईला लेकीचं लग्न मान्य नव्हतं. कारण वेश्या असणाऱ्या महिलांच्या आयुष्यात कधीच प्रेम नसतं.. असं निग्गो यांच्या आईचं म्हणणं होतं.
मुलीचं लग्न मान्य नसल्यामुळे निग्गो यांच्या आईने आजाराचं कारण सांगत मुलीला हिरामंडी येथे पुन्हा बोलावून घेतलं. निग्गो यांच्या आईने त्यांना धमकावले आणि वेश्यागृहात राहण्यासाठी ब्रेनवॉश केला. त्यानंतर निग्गो यांनी हीरामंडी याठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला.
काही दिवसांनंतर निग्गो यांचे पती निर्माते ख्वाजा मजहर पत्नीला पुन्हा घरी घेवून जाण्यासाठी आले होते. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. 5 जानेवारी 1972 मध्ये ख्वाजा मजहर निग्गो यांची समज घालण्यासाठी हीरामंडी याठिकाणी गेले. पण निग्गो यांनी पुन्हा पतीच्या घरा जाण्यास नकार दिला.
पत्नीने घरी येण्यासाठी नकार दिल्यामुळे यानंतर मजहर यांचा संयम सुटला आणि त्यांनी निग्गो यांची गोळ्या झाडून हत्या केली. गोळीबारात निग्गो यांचे काका आणि दोन संगीतकारही मारले गेले. निग्गो यांच्या पतीला न्यायालयाने खटल्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. निग्गो यांना लाहोरच्या मियाँ साहिब कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलं.