मुंबई | ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘क्रांती’, ‘सत्ते पर सत्ता’, ‘अंदाज’, ‘राजा राणी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘तू हसी मै जवान’ अशा अनेक सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत अभिनेत्री हेमा मालिनी यांनी चाहत्यांच्या मनार राज्य केलं. आज हेमा मालिनी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी त्यांची चर्चा मात्र कायम रंगत असते. हेमा मालिनी फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळेच नाही, तर प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असायच्या. चाहते देखील त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असायचे. हेमा मालिनी यांनी त्यांच्या प्रत्येक सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘बागबान’ सिनेमात काम करण्यासाठी हेमा मालिनी तयार नव्हत्या.
अमिताभ आणि हेमा यांनी ‘बागबान’ सिनेमाशिवाय वीर-झारा यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. पण ‘बागबान’ सिनेमासाठी हेमा यांचा नकार होता. कारण सिनेमात त्यांना चार मोठ्या मुलांच्या आईची भूमिका साकारायची होती. सुरुवातील हेमा मालिनी यांनी सिनेमासाठी नकार दिला. पण आईच्या हट्टामुळे अभिनेत्रीला ‘बागबान’ सिनेमात काम करावं लागलं.
सध्या हेमा मालिनी यांनी दिलेली एक मुलाखत तुफान चर्चेत आहे. मुलाखतीत बागबान सिनेमाबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या, ‘माझ्या लक्षात आहे जेव्हा रवी चोप्रा यांनी मला बागबान सिनेमाची कथा सांगितली, तेव्हा माझी आई देखील माझ्यासोबत होती. रवी चोप्रा गेल्यानंतर आईला सांगितलं चार मुलांच्या आईची भूमिका साकारण्यासाठी ते मला सांगत आहेत. मी हे कसं करु शकते’
पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘सिनेमासाठी माझा नकार होता. पण आई म्हणते होती, तुला ही भूमिका करायला हवी. सिनेमाची कथा चांगली आहे. आईने भूमिका साकारण्यासाठी हट्ट धरला होता. तेव्हा मी चार मुलांच्या आईची भूमिका साकारण्यासाठी तयार झाली.’ अखेर आईच्या हट्टामुळेल हेमा मालिनी यांनी ‘बागबान’ सिनेमात चार मुलांच्या आईची भूमिका साकारली आणि त्यांना एक नवीन ओळख मिळाली.
‘बागबान’ सिनेमाला चाहत्यांची पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने मोठी मजल मारली. ‘बागबान’ सिनेमाची चर्चा आजही चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. सिनेमात अनेक कलाकारांनी भूमिका साकारली होती. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री महिमा चौधरी यांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.
हेमा मालिनी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली आहेत. पण आजपर्यंत हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या मुख्य घराची पायरी चढू शकल्या नाहीत.