नवी दिल्ली | 4 ऑगस्ट 2023 : करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. 28 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील एका सीनची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा चित्रपटात किसिंग सीन आहे. याच सीनवरून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि खासदार हेमा मालिनी यांनीसुद्धा त्या किसिंग सीनवर प्रतिक्रिया दिली आहे. भाऊ आर. के. चक्रवर्ती यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनानिमित्त त्या नवी दिल्लीत होत्या. यावेळी त्यांना त्या सीनवर प्रश्न विचारण्यात आला.
धर्मेंद्र आणि शबाना यांच्या किसिंग सीनबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या, “मी तो चित्रपट अद्याप पाहिला नाही. मात्र लोकांना चित्रपटातील त्यांचं अभिनय खूप आवडलं असेल याची मला खात्री आहे. मी धरमजींसाठी खूप खुश आहे कारण त्यांना कॅमेरासमोर राहणं नेहमीच खूप आवडतं. ते त्याशिवाय जगू शकत नाहीत. घरी असतानाही ते स्वत:चा जुना व्हिडीओ पाहून विचारायचे की मी त्यात कसा दिसतोय.”
याआधी शबाना यांचे पती जावेद अख्तर यांनीसुद्धा त्या किसिंग सीनवर प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत शबाना यांनी सांगितलं की ‘रॉकी और रानी..’मधील धर्मेंद्र यांच्यासोबतच्या किसिंग सीनचा जावेद यांना फारसा फरक पडला नाही. “त्यांना काहीच फरक पडला नाही. पण त्यांना माझा रावडी स्वभाव थोडा खटकला. संपूर्ण चित्रपटादरम्यान मी मोठमोठ्याने बोलत होते, शिट्ट्या वाजवत होते, ओरडत होते. माझ्या बाजूला बसलेली महिला तीच आहे का असा प्रश्न त्यांना चित्रपट पाहताना पडला होता. मी उत्सुकतेने वेडी झाले होते”, असं त्या म्हणाल्या.
“माझ्या सीनची इतकी चर्चा होईल असं मला वाटलं नव्हतं. जेव्हा पडद्यावर आमचा किसिंग सीन येतो तेव्हा लोक टाळ्या वाजवतायत, हसत आहेत. त्या सीनच्या शूटिंगदरम्यान आम्हाला कोणतीच समस्या नव्हती. हे खरंय की याआधी मी स्क्रीनवर असे सीन्स फारसे केले नव्हते. पण धर्मेंद्र यांच्यासारख्या हँडसम व्यक्तीला कोणाला किस न करावंसं वाटेल?”, असंही त्या मस्करीत म्हणाल्या.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाद्वारे करण जोहरने जवळपास सात वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलं आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पंजाबी कुटुंबातील रॉकी आणि बंगाली कुटुंबातील रानीची ही प्रेमकहाणी आहे.