मुंबई, 17 जुलै 2023 : मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा नायक अशी प्रतिमा असलेले अभिनेते रवींद्र महाजनी यांचं एकाकी अवस्थेत निधन झालं. तळेगाव इथल्या आंबीमध्ये एका सदनिकेत ते शुक्रवारी मृतावस्थेत आढळले. शनिवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. रवींद्र महाजनी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा गश्मीर महाजनी, मुलगी डॉ. रश्मी, सून आणि नातवंडं असा परिवार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून ते तळेगावमध्ये एकटेच भाडेतत्त्वावर राहत होते. महाजनी यांचं कुटुंब, त्यांचा मुलगा गश्मीरची लोकप्रियता, आर्थिक स्थैर्य या जमेच्या बाजू असूनही ते एकटे भाड्याच्या घरात का राहत होते, असा सवाल अनेकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला. या सर्व चर्चांवर आता एका मराठी अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री हेमांगी कवीने फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे, अशी विनंती तिने या पोस्टद्वारे केली आहे.
‘आपण कोण झालो आहोत? काल ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी गेल्याचं कळलं. अर्थात आधी सोशल मीडियावरून नंतर न्यूज चॅनलमधून. पण ते गेल्याची पेक्षा ते कसे गेले याचीच बातमी सर्वत्र जास्त पसरली. जाणाऱ्याला तरी नीट जाऊ द्या रे. अर्थात बातमी देणाऱ्यांची आता ती स्टाइल झाली आहे, बातम्या अशाप्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्याची. त्याशिवाय लोकं बातमीच बघत नाहीत असं त्यांना वाटतं. त्यांचा दोष नाही, शेवटी प्रत्येकाला पोट आहेच. पण त्या बातमीवर आलेल्या कमेंट्स वाचून माणूसपणाची सिसारी आली. ते इतकं अंगावर आलं की श्रद्धांजली वाहणं नकोस झालं,’ अशा शब्दांत हेमांगी व्यक्त झाली.
‘त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही माहीत नसताना वाट्टेल ते बोलत सुटले लोक. त्यांच्या मुलाबद्दल, पत्नीबद्दल. असं मरण अनेक लोकांना येत असावं पण केवळ ते अभिनेते होते, प्रसिद्ध होते म्हणून वाट्टेल ते बोलण्याचा परवाना घेतला आपण. रवींद्रची जिथं कुठं आहात तिथं शांत असाल आणि आम्हाला माफ कराल अशी मी आशा करते. गश्मीर महाजनी आधीच इतका स्ट्रगल करून उभा आहेस, त्यात आता याची भर. खरंच खूप खूप सॉरी आणि तुला हे सर्व सहन करण्याची शक्ती मिळो’, असं तिने पुढे म्हटलंय.
या पोस्टच्या अखेरीस हेमांगीने नेटकऱ्यांनाही महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘सोशल मीडियावर किंवा कुठेही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण जरा तारतम्य ठेवलं तर नाही चालणार का’, असा सवाल तिने केला आहे.