मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक मुद्द्यांवर आपलं परखड आणि स्पष्ट मत मांडणारी हेमांगी आता मात्र भावुक झाली आहे. नुकताच तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेसोबतच अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते सुनील होळकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूनील होळकर गेल्या काही दिवसांपासून लिव्हर सोरायसिस या गंभीर आजाराला झुंज देत होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. सुनील यांच्या निधनानंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.
सुनील होळकर यांच्या काही दिवस आधीच पराग बेडेकर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देखील कलाविश्व आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. पराग बेडेकर आणि सुनील होळकर यांच्या निधनानंतर हेमांगी कवीने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. सध्या हेमांगीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दोन मित्रांच्या निधनानंतर हेमांगी भावुक होत म्हणाली, ‘काही दिवसांपुर्वी पराग बेडेकर गेला, आता सुनील होळकर! आपल्या ओळखीची, सतत हसतमुख, जिंदादील माणसं जेव्हा अशी अचानक निघून जातात तेव्हा खरंच काही वेळ काय करावं, काय बोलावं सुचत नाही! डोक्यात आधी चाललेल्या विचारांची चक्र अचानक थांबतात. सुन्न.’ असं हेमांगी म्हणाली.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जे कळलंय ते खरं आहे का? असं कसं शक्य आहे? अरे कालच तर त्याने मेसेज केला होता! हे सगळं प्रोसेस व्हायला वेळ लागतो आणि process जरी झालं तरी पराग आणि सुनील… मित्रांनो, Not done!’ असं म्हणत हेमांनी मित्रांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले.
सुनील होळकर यांच्या निधनानंतर मन सुन्न करणारी गोष्ट म्हणजे अभिनेत्याला मृत्यूचा भास झाला होता. सुनील यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेवटचा मेसेज मित्रांसाठी पोस्ट केला होता. ‘ही माझी शेवटची पोस्ट आहे. सर्वांचा निरोप घेण्याआधी मिळालेल्या प्रेमाचे आभार मानायचे आहेत. जर काही चूक झाली असेल तर माफी असावी…’ असं व्हॉट्सअॅप स्टेटस सुनील यांनी ठेवलं असल्याचं सांगण्यात येत आहे.