मुंबई: वर्षभरापूर्वी ‘झिम्मा’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. जगभरातल्या प्रेक्षकांनी या चित्रपटावरून भरभरून प्रेम केलं होतं. आता या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा झाली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीक्वेलचा व्हिडीओ पोस्ट करत ‘झिम्मा 2’ची घोषणा करण्यात आली. बॉलिवूड दिग्दर्शक आनंद एल. राय या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोशल मीडियावरील या व्हिडीओत निर्मला (निर्मिती सावंत) पुन्हा एकदा त्यांच्या साहेबांकडे (अनंत जोग) फिरायला जाण्यासाठी परवानगी मागत असतात. यावेळी साहेबांनीही त्यांच्यासोबत ट्रीपला येण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांना नकार देत पुन्हा एकदा ‘बाया बायाच’ ट्रीपला जायची तयारी करत असल्याचं निर्मला सांगतात. आता निर्मला आणि साहेबांच्या मुलाचं लग्न झालं आहे. घरात सून आली आहे. त्यामुळे सूनबाईंना सोबत घेऊन जा, असं ते निर्मलाला सांगतात.
आता ही सूनबाई कोण, यावेळी ही ट्रीप कुठे जाणार आणि त्यात कोणकोणत्या मैत्रिणी असणार, हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे. “2021 मध्ये हा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता. त्यातून एक चांगला संदेश देण्यात आला आणि त्यामुळे प्रेक्षक प्रभावित झाले. म्हणूनच आम्ही झिम्मा 2 ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे”, असं निर्माते आनंद एल. राय म्हणाले.
झिम्मा 2 विषयी हेमंत म्हणाला, “झिम्मावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. यातील प्रत्येकीमध्ये गृहिणींनी, तरुणींनी स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न केला. एकट्या घराबाहेर न राहिलेल्या महिलांनीही त्यांच्या मैत्रिणींसोबत सहलींचे प्लॅन्स केले. त्या सर्व प्रेमाखातर मी झिम्मा 2 चा निर्णय घेतला.”
झिम्मा या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांसह अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमेनंही भूमिका साकारल्या होत्या.