बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाने करीना कपूर हिला नोटीस बजावली आहे. करीना कपूर तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आली आहे. ‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ नावाच्या वादग्रस्त पुस्तकाबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. करीना कपूर हिच्या शिवाय, आदिती शाह भीमजियानी, ॲमेझॉन इंडिया, जुगरनॉट बुक्स आणि इतरांनाही नोटीस बजावली आहे. न्यायालयाने नोटीस बजावत उत्तर मागितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 1 जुलै रोजी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.
संबंधीत प्रकरणी सांगायचं झालं तर, जबलपूर सिव्हिल लाइनचे रहिवासी ख्रिस्तोफर अँथनी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकाद्वारे ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. सध्या सर्वत्र करीना कपूर हिच्यावर होत असलेल्या आरोपांची चर्चा रंगली आहे.
याचिकेद्वारे करीना कपूरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. करीना कपूर खान हिने लोकप्रियता मिळवण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे, पुस्तकाचं मुखपृष्ठ देखील आक्षेपार्ह आहे, असंही सांगण्यात येत आहे.
‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने पुस्तकात प्रेग्नेंसी दरम्यान स्वतःला आलेले अनुभव मांडले आहेत. ज्यामध्ये तिने एकदा सेटवर बेशुद्ध झाल्याचे सांगितले आहे. अगदी गरोदरपणातही अभिनेत्री तिच्या सिनेमाचे सातत्याने शूटिंग करत होती, जिथे तिच्यासोबत ही घटना घडली.
‘करीना कपूर खान खान्स प्रेग्नेन्सी बायबल’ चे कव्हर लाँच झाल्यानंतर amazon मधील प्रथम क्रमांकाचा बेस्टसेलर म्हणून हे पुस्तक ट्रेंडिंग झालं होतं. सध्या सर्वत्र करीना कपूर आणि तिच्या पुस्तकाची चर्चा रंगली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
करीना कपूर हिने अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर दोन मुलांना जन्म दिला. अभिनेत्रीच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर अली खान असं आहे तर, दुसऱ्या मुलाचं नाव जेह अली खान असं आहे. अभिनेत्री कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.