अभिनेता टॉम क्रूझ (Tom Cruise) हा हॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई (Highest paid) करणारा अभिनेता ठरला आहे. ‘टॉप गन: मॅव्हरिक’ (Top Gun: Maverick) या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून त्याने तब्बल 10 कोटी डॉलर्सची कमाई केल्याचं समजतंय. तर ऑस्कर पुरस्कार विजेता विल स्मिथ हा सर्वाधिक मानधन घेणारा दुसरा अभिनेता ठरला आहे. आगामी ‘एमॅन्सीपेशन’ या चित्रपटासाठी त्याने 3.5 कोटी डॉलर्स इतकं मानधन घेतलंय. या यादीत लिओनार्डो डिकॅप्रियो, ब्रॅड पिट, ड्वेन जॉन्सन, विन डिझेल आणि जोकिन फिनिक्स यांचाही समावेश आहे. टॉमने ‘टॉप गन: मॅव्हरिक’ या हिट चित्रपटाची निर्मितीसुद्धा केली आहे, बॉक्स ऑफिसची कमाई, त्याचं मानधन आणि स्ट्रीमिंगच्या कमाईतून मिळणारा भाग असं सर्व मिळून तो 10 कोटी डॉलर्सपेक्षाही अधिक कमाई करण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात 1.2 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणारा हा टॉम क्रूझचा पहिला चित्रपट ठरला आहे.
‘व्हरायटी’ने दिलेल्या वृत्तानुसार, टॉमला पॅरामाउंट पिक्चर्स या स्टुडिओच्या आधीच बॉक्स ऑफिसच्या कमाईचा बोनस मिळतो. टॉम आणि ड्वेन जॉन्सन, ज्यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘ब्लॅक अॅडम’साठी 2.25 कोटी डॉलर्स कमावले आहेत, हे दोन सेलिब्रिटी त्यांच्या मोठ्या मानधनासाठी पात्र आहेत असं या वृत्तात म्हटलंय. “मी टॉम क्रूझविरुद्ध कधीही पैज लावू शकत नाही. बहुतांश अभिनेते असे आहेत, ज्यांच्यावर कितीही पैसा खर्च केला तरी काम चांगलं होत नाही. पण क्रूझ आणि ड्वेन जॉन्सन हे जितकं मानधन घेतात, त्या दर्जाचं कामदेखील करतात”, अशी प्रतिक्रिया एका मूव्ही एक्झिक्युटिव्हने व्हरायटीला दिलेल्या मुलाखतीत दिली.
‘व्हरायटी’च्या रिपोर्टनुसार दुसरा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता हा विल स्मिथ आहे. ज्याने आगामी अॅक्शन थ्रिलर एमॅन्सिपेशनसाठी 3.5 कोटी डॉलर्स रुपये घेतले आहेत. मार्च महिन्यात ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात निवेदक ख्रिस रॉकला कानशिलात लगावल्याने विल चर्चेत आला होता.
सर्वाधिक कमाई करणार्या इतर अभिनेत्यांमध्ये लिओनार्डो डिकॅप्रियोचा समावेश आहे. लिओनार्डोने आगामी चित्रपट ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटासाठी 3 कोटी डॉलर्स इतकं मानधन घेतलंय. तर ब्रॅड पिटने फॉर्म्युला 1 साठी 3 कोटी डॉलर्स घेतले आहेत. दरम्यान, ख्रिस हेम्सवर्थने एक्स्ट्रॅक्शन 2 साठी, डेन्झेल वॉशिंग्टन याने इक्वेलायझर 3 साठी, विन डिझेलने फास्ट X साठी, जोक्विन फिनिक्सने जोकर 2 साठी, टॉम हार्डीने व्हेनम 3 साठी, विल फेरेल आणि रायन रेनॉल्ड्सने स्पिरिटेडसाठी प्रत्येकी 2 कोटी डॉलर्स रुपये मानधन घेतले आहेत.