सौदी अरब : 13 जानेवारी 2024 | टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान उमराह करण्यासाठी मक्का आणि मदीनाला पोहोचली आहे. मुस्लीमांचं हे धार्मिक स्थळ सौदी अरबमध्ये आहे. हिनाने सोशल मीडियावर उमराह करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. मक्का आणि मदीना ही मुस्लीम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र स्थळं आहेत. याठिकाणी उमराह करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून मुस्लीम बांधव येतात. हिना खानची ही दुसरी वेळ आहे. याआधीही तिने मक्कामध्ये उमराह केला आहे. हिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काबा पोहोचण्याचा अनुभवसुद्धा सांगितला आहे. या फोटोंमध्ये हिना काळ्या रंगाच्या अबायामध्ये दिसून येत आहे.
इन्स्टाग्रामवर हिनाने उमराह करतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात दोन्ही हात वर उचलून ती दुआं मागताना दिसतेय. ‘हा माझा पहिलाच अनुभव नव्हता. तरीसुद्धा चिंता, भीती आणि मनातील भावना या पहिल्यासारख्याच होत्या. याठिकाणी लहान मुलीसारखं रडायला येतं. इथे हिप्नोटाइज झाल्यासारखं वाटतं. जेव्हा तुम्ही काबाला पाहता, तेव्हा मन शांत होतं. तुम्ही एका सेकंदासाठीही डोळे मिटू शकत नाही. हा संपूर्ण अनुभव खूप चांगला होता. ही जागा खूप मानसिक शांती देते’, अशा शब्दांत तिने अनुभव सांगितला आहे.
हिनाने मतफ एरियामध्ये जाऊन नमाज पठण केलं आणि गर्दीने भरलेल्या या जागेत पहिल्यांदा दुआ करण्याचा आनंदही व्यक्त केला. ‘मतफ एरियामध्ये नमाज पठणासाठी जागा शोधणं खूप कठीण असतं. कारण या ठिकाणी सतत लोकांची गर्दी असते. विशेषकरून महिलांसाठी हे खूप कठीण आहे. मी मतफच्या पहिल्या रांगेत नमाज पठण केलं’, असंही तिने सांगितलं आहे. याआधी मार्च 2023 मध्ये हिना उमराह करण्यासाठी याठिकाणी आली होती. उमराह ही एक धार्मिक प्रक्रिया आहे. हज यात्रा ही वर्षाच्या एका विशेष महिन्यात केली जाते. मात्र उमराह वर्षातून कधीही करता येते.
काही दिवसांपूर्वी हिनाची तब्येत बिघडली होती. तिच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. स्वत: हिनाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षराची भूमिका साकारून हिनाला लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.