अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा प्रियकर झहीर इक्बाल आज (23 जून) लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही जोडी सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या घरी लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांनाही सुरुवात झाली आहे. सोनाक्षी हिंदू आणि झहीर मुस्लीम असल्याने कोणत्या धर्माच्या विवाहपद्धतीनुसार दोघं लग्न करतील, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्याचं उत्तर आता सोनाक्षीच्या होणाऱ्या सासऱ्यांनी दिलं आहे. झहीरचे वडील इक्बाल रतन्सी यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विवाहपद्धतींबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. इक्बाल यांनी सांगितलं की सोनाक्षी-झहीरचं लग्न ना हिंदू पद्धतींनुसार होईल ना मुस्लीम पद्धतीने. हे दोघं सिव्हिल मॅरेज करतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
या लग्नाच्या पार्श्वभूमीवर सोनाक्षीबद्दल आणखी एक चर्चा रंगली आहे. ती म्हणजे लग्नानंतर ती तिचं धर्म परिवर्तन करणार का? त्यावरही झहीरच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोनाक्षीच्या धर्म परिवर्तनच्या चर्चांना त्यांनी फेटाळल्या आणि सांगितलं की सोनाक्षी धर्म परिवर्तन करणार नाही. दोन मनं एकत्र येणार आहेत, यात धर्माची काहीच भूमिका नाही, असंही ते म्हणाले. इतकंच नाही तर त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की त्यांना माणुसकीवर अधिक विश्वास आहे. “हिंदू लोक देव म्हणतात तर मुस्लीम अल्लाह म्हणतात. देव आणि अल्लाहला मानणारे सर्वजण माणूसच आहेत. माझा सोनाक्षी आणि झहीरला पूर्ण आशीर्वाद आहे”, असं ते म्हणाले.
सोनाक्षी आणि झहीर हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचं ‘रामायणा’ हे घरसुद्धा विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं आहे.
झहीर 35 वर्षांचा असून त्याच्या कुटुंबीयांचा दागिन्यांचा व्यवसाय आहे. इक्बाल रतन्सी यांचा तो मुलगा आहे. इक्बाल हे अभिनेता सलमान खानचे खास मित्र आहेत. तर इक्बाल यांचा भाऊ सनम रतन्सी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहेत. अगदी लहानपणापासून झहीर सलमानचा चाहता आहे आणि त्यालाच तो मार्गदर्शक म्हणतो. सलमानची बहीण अर्पिता खानसोबत त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं. सलमाननेच झहीरला बॉलिवूडमध्ये लाँच केलं. 2019 मध्ये ‘नोटबुक’ या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. यामध्ये अभिनेते मोहनिश बहल यांची मुलगी प्रनुतन बहल हिने झहीरसोबत मुख्य भूमिका साकारली होती.