मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानने त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटानिमित्त ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) सेशनदरम्यान शाहरुखने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. या सेशनदरम्यान अनेकदा शाहरुखचा मजेशीर स्वभाव त्याच्या उत्तरांमध्ये दिसून येतो. चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं त्याने आपल्याच खास अंदाजात दिली आणि त्याच्या या अंदाजाने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. या सेशनदरम्यान एका युजरने शाहरुखला त्याच्या घराच्या वीज बिलाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर शाहरुखने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.
‘तुझ्या घराचं वीज बिल दर महिन्याला किती येतं’, असा प्रश्न एका युजरने शाहरुखला विचारला. त्यावर किंग खानने लिहिलं, ‘हमारे घर प्यार का नूर फैला हुआँ है. उसी से रोशनी होती है.. बिल नहीं आता’ (आमच्या घरात प्रेमाचा प्रकाश पसरलेला असतो, त्यानेच घर प्रकाशमय होतं.. बिल येत नाही.) त्याच्या या उत्तरावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Humare ghar me pyaar ka noor phaila hua hai. Ussi se Roshini hoti hai….bill nahi aata. #Jawan https://t.co/WFEUKIZKrb
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 10, 2023
शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत आहे. तिच्याबद्दल एका युजरने कमेंट केली असता, शाहरुखने त्यावरही मजेशीर उत्तर दिलं. ‘नयनतारा मॅडम पे लट्टू हुए या नहीं?’, असा सवाल संबंधित युजरने केला. त्यावर किंग खान म्हणाला, ‘चुप करो, दो बच्चों की माँ है वो.. हाहाहा’ (गप्प बसा, दोन मुलांची आई आहे ती). शाहरुखचं हे उत्तरसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जवान या चित्रपटाची निर्मिती शाहरुखची पत्नी गौरी खान आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंटने केली आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अटलीने ‘जवान’चं दिग्दर्शन केलं आहे. शाहरुख खान, नयनतारा आणि दीपिका पदुकोणसोबतच यामध्ये साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याशिवाय सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिधी डोग्रा, सुनील ग्रोवर आणि मुकेश छाब्रा अशी कलाकारांची मोठी फौजच आहे.