काही काळापूर्वी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई म्हणजे विक्रमच मानलं जायचं. नंतर हाच आकडा मोठ्या चित्रपटांचा बजेटसाठी चर्चेत आला. इतकंच काय तर सुपरस्टारसुद्धा त्यांच्या मोठमोठ्या चित्रपटांसाठी 100 कोटी रुपये मानधन घेत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र आज टेलिव्हिजनवर काम करूनही 100 कोटींपेक्षा अधिक कमाई होऊ शकते, हे सिद्ध झालंय. रिपोर्ट्स पाहिल्यास, बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमान हा अवघ्या सहा आठवड्यांत एवढी रक्कम कमावतोय. ‘बिग बॉस’च्या अठराव्या सिझनद्वारे तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनसाठी त्याने तगडं मानधन घेतल्याचं कळतंय. 6 ऑक्टोबरपासून हा शो कलर्स टीव्हीवर सुरू झाला आहे.
‘हर जिंदगी’च्या रिपोर्टनुसार, सलमान खान ‘बिग बॉस 18’च्या सूत्रसंचालनासाठी दर महिन्याला 60 कोटी रुपये मानधन घेतोय. गेल्या सिझनच्या तुलनेत सलमानने या सिझनसाठी मानधन आणखी वाढवलं आहे. जर हा सिझन 15 आठवड्यांपर्यंत चालला, तर सलमान त्यातून तब्बल 250 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान बिग बॉसचं सूत्रसंचालन करतोय. हिंदी बिग बॉसच्या सूत्रसंचालनासाठी सलमानशिवाय प्रेक्षक दुसऱ्या कोणत्या अभिनेत्याची कल्पनाच करू शकत नाहीत. सलमानच्या अनुपस्थितीत या शोचा टीआरपी खाली घसरल्याचं पहायला मिळालं. त्यामुळेच निर्माते त्याला अधिक मानधन देण्यासही तयार आहेत.
चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, जेव्हा सलमानने 15 वर्षांपूर्वी बिग बॉसची ऑफर स्वीकारली, तेव्हा तो एका चित्रपटासाठी जवळपास 5 ते 10 कोटी रुपयांचं मानधन स्वीकारत होता. आज तो एका चित्रपटातून तब्बल 150 कोटी रुपयांची कमाई करतो. आता वर्षभरातील बराच वेळ बिग बॉसला द्यावा लागत असल्याने, त्याने चित्रपचाइतकीच फी आकारली आहे. यामुळे तो टेलिव्हिजनवरील सर्वांत महागडा सूत्रसंचालक ठरला आहे. फक्त ‘वीकेंड का वार’चं सूत्रसंचालन करून सलमानला इतकं मोठं मानधन मिळतंय.
मध्यंतरीच्या काळात सलमान ‘बिग बॉस’ सोडणार असल्याची चर्चा होती. वर्षभरातील बराच वेळ या शोसाठी द्यावा लागत असल्याने त्याने माघार घेतल्याचं कळत होतं. मात्र बिग बॉसचा नवीन प्रोमो पाहता सलमान भविष्यातही या शोचं सूत्रसंचालन करताना दिसेल असं स्पष्ट होतंय. भविष्यात मी कदाचित ‘बिग बॉस 38’चंही सूत्रसंचालन करेन, असं सलमान या प्रोमोत म्हणताना दिसतोय.