मुंबई: अभिनेता हृतिक रोशनला त्याच्या लूक आणि शरीरयष्टीमुळे ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर सिक्स-पॅक ॲब्सचा फोटो पोस्ट केला होता. हे पाहून चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा हृतिकच्या फिटनेसची चर्चा सुरू झाली. मात्र नुकतंच त्याला मुंबईतील एका क्लिनिकबाहेर पाहिलं गेलं. त्यामुळे चाहते त्याच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करत आहेत. 12 जानेवारी रोजी हृतिकला मुंबईतील एका बोन मॅरो ट्रान्सप्लांट क्लिनिकबाहेर पाहिलं गेलं.
या क्लिनिकमध्ये हृतिकने चेक-अपसाठी गेल्याचं म्हटलं जात आहे. 2014 मध्ये ‘बँग बँग’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हृतिकच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. या घटनेच्या दोन महिन्यांनंतर त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून ब्लड-क्लॉट काढण्यात आले होते. आता हृतिकला क्लिनिकबाहेर पाहिल्यानंतर तो बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणार आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
हृतिक गेल्या काही वर्षांपासून डिप्रेशनचाही सामना करतोय. एका मुलाखतीत खुद्द त्यानेच याविषयी खुलासा केला होता. ‘वॉर’ या चित्रपटासाठी मी अजिबात तयार नव्हतो. मात्र तरीही मी त्याला होकार दिला, असं त्याने सांगितलं होतं. वॉर चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं, असंही तो म्हणाला होता.
हृतिक लवकरच ‘फायटर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी हृतिकचा सैफ अली खानसोबत ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट विशेष कामगिरी करू शकला नाही.