अभिनेता आर. माधवनचा (R Madhavan) मुलगा वेदांत माधवनने (Vedaant Madhavan) डॅनिश ओपन (Danish Open) स्विमिंग स्पर्धेत आधी रौप्य आणि नंतर सुवर्णपदक जिंकत देशाची मान उंचावली. 800 मीटर पुरुष फ्री-स्टाइल स्विमिंग विभागात वेदांतने सुवर्ण कामगिरी केली. त्याआधी 1500 मीटर फ्री-स्टाइल स्विमिंग स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावलं. मुलाच्या या दमदार कामगिरीने भारावलेल्या आर. माधवनने सोशल मीडियावर पोस्ट लिहित आनंद व्यक्त केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वेदांत माधवनने विजयनानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “मला फक्त आर. माधवनचा मुलगा म्हणून राहायचं नाहीये”, असं त्याने या मुलाखतीत म्हटलंय. त्याचप्रमाणे आपल्याला इथवर आणण्यासाठी आईवडिलांनी सर्वांत मोठा त्याग केला आहे, असंही त्याने सांगितलं.
‘दूरदर्शन इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत वेदांत म्हणाला, “मला माझ्या बाबांच्या सावलीखाली जगायचं नव्हतं. मला माझं स्वत:चं नाव कमवायचं होतं. फक्त आर. माधवनचा मुलगा म्हणून मला राहायचं नाहीये. त्यांनी माझी नेहमीच काळजी घेतली आहे. आई आणि बाबा दोघंही माझ्यासाठी खूप काही करतात. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी केलेला सर्वांत मोठा त्याग म्हणजे ते मुंबई सोडून दुबईला राहायला आले.”
गेल्या वर्षी आर. माधवन त्याच्या कुटुंबीयांसह दुबईला राहायला गेला. वेदांतला चांगलं प्रशिक्षण मिळावं यासाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. “कोविडमुळे मुंबईतील काही स्विमिंग पूल बंद आहेत तर काही खूपच लांब आहेत. प्रशिक्षणासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वेदांतच्या 2026च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या तयारीला अडथळा येऊ नये म्हणून कुटुंबाने हे पाऊल उचललंय. दुबईत त्याला मोठ्या स्विमिंग पूलसाठी प्रवेश मिळाला आहे. सरिता आणि मी त्याच्या पाठिशी आहोत. तो ऑलिम्पिकसाठी तयारी करतोय”, असं माधवनने सांगितलं होतं.
वेदांतने मार्च 2021 मध्ये लॅटव्हिया ओपनमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. गेल्या वर्षी ज्युनियर नॅशनल ॲक्वाटिक चॅम्पियनशिपमध्येही त्याने चार रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली होती. भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकण्याचं त्याचं स्वप्न आहे.
हेही वाचा:
‘काही खरं नाही हिचं’; ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीसाठी यशराज मुखातेची पोस्ट चर्चेत
Nagraj Manjule: “प्रेम करणं हाच विद्रोह”; पहा नागराज मंजुळेंचं गाजत असलेलं ‘विद्रोही’ भाषण