मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पलक तिच्या बॉलिवूड पदार्पणासोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. या अफेअरच्या चर्चांवर पलकने एका मुलाखतीत प्रतिक्रियासुद्धा दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा पलक आणि इब्राहिमला एकत्र पाहिलं गेलं आहे. बुधवारी मुंबईतील एका पार्टीला या दोघांनी हजेरी लावली होती. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पार्टीसाठी दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.
अभिनेता करण मेहताच्या वाढदिवसाच्या पार्टीला पलकने हजेरी लावली होती. यावेळी इब्राहिम अली खानलाही पाहिलं गेलं. या पार्टीला इब्राहिम आणि पलक वेगवेगळे आले तरी पुन्हा एकदा या जोडीची चर्चा होऊ लागली आहे. या पार्टीला निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपसुद्धा तिच्या होणाऱ्या पतीसोबत उपस्थित होती. आलिया आमि शेन ग्रेगॉइरने यावेळी पापराझींचं विशेष लक्ष वेधलं होतं.
पलक तिवारीने या पार्टीसाठी काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तर इब्राहिमने काळ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची डेनिम घातली होती. पार्टीला जाण्यापूर्वी दोघांनी पापाराझींना फोटोसाठी पोझ दिले. सोशल मीडियावर दोघांचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया होत आहेत. ‘क्युट कपल’ असं एकाने लिहिलं. तर अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
2021 मध्ये गायक हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या म्युझिक व्हिडीओतून पलकने पदार्पण केलं. हे गाणं त्यावेळी तुफान हिट ठरलं होतं. त्यानंतर तिला बऱ्याच पार्ट्यांमध्ये इब्राहिमसोबत पाहिलं गेलं. एकदा दोघांना कारमध्ये एकत्र पाहिल्यानंतर पलकने पापाराझींपासून चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. इब्राहिमसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला असता पलक एका मुलाखतीत म्हणाली होती, “शूटिंगमुळे मी खूप व्यग्र असते, त्यामुळे अशा चर्चांकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नसतो. माझ्यासाठी हे वर्ष फार महत्त्वाचं आहे. कदाचित अशा चर्चा होणं हा या इंडस्ट्रीचा एक भागच आहे. पण मी माझ्या कामाकडे अधिक लक्ष केंद्रीत करू इच्छिते.”