चेन्नई : 26 जानेवारी 2024 | प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक इलैयाराजा यांची मुलगी आणि पार्श्वगायिका भवतारिणी यांचं गुरुवारी 25 जानेवारी रोजी निधन झालं. गेल्या काही काळापासून त्या यकृताच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यावरील आयुर्वेदिक उपचारासाठी त्या श्रीलंकेला गेल्या होत्या. अखेर गुरुवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भवतारिणी यांचं पार्थिव आज (शुक्रवार) चेन्नईला आणलं जाणार असून तिथेच अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. भवतारिणी या 47 वर्षांच्या होत्या. इलैयाराजासुद्धा सध्या श्रीलंकेत आहेत. या आठवड्याच्या अखेरीस ते एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणार होते.
सुरुवातीला भवतारिणी यांच्या पित्ताशयात स्टोन झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र नंतर त्यांना यकृतचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं. तोपर्यंत हा कॅन्सर अंतिम म्हणजेच चौथ्या स्टेजपर्यंत पोहोचला होता. भवतारिणी या इलैयाराजा यांच्या कन्या आणि कार्तिक राजा, युवान शंकर राजा यांच्या बहिणी होत्या. ‘भारती’ या तमिळ चित्रपटातील ‘माइल पोला पोन्नू ओन्नू’ या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. भवतारिणी या उत्कृष्ट पार्श्वगायिका आणि संगीतकार होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरु होते. उपचारासाठी त्यांना श्रीलंकेला नेण्यात आलं होतं. तिथल्या एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भवतारिणी यांनी ‘रासैया’ या चित्रपटापासून गायनक्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी वडील इलैयाराजा आणि भाऊ कार्तिक, युवान यांच्यासाठी गाणी गायली होती. याशिवाय भवतारिणी यांनी देवा आणि सिर्पी या संगीतकारांसोबतही काम केलं आहे. 2002 मध्ये त्यांनी रेवती दिग्दर्शित ‘मित्र, माय फ्रेंड’ या चित्रपटातील गाण्यांसाठी संगीतकार म्हणून काम केलं होतं. त्यानंतर ‘फिर मिलेंगे’ आणि इतर काही चित्रपटांसाठी त्यांनी संगीतकार म्हणून काम केलं. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘मायानदी’ हा म्युझिक अल्बम लाँच झाला होता. भवतारिणी यांनी ‘कढलुकू मरियाधाई’, ‘भारती’, ‘अझागी’, ‘फ्रेंड्स’, ‘पा’, ‘मंकटा’ आणि ‘आनेगन’ यांसारख्या तमिळ चित्रपटांमधील गाणी गायली आहेत.