सैराट झालं जी.. सर्वाधिक पसंती मिळालेल्या IMDb च्या 250 चित्रपटांमध्ये आर्ची-परश्याची बाजी

| Updated on: Oct 01, 2024 | 2:06 PM

'सैराट' हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झालेला आणि मराठीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातून ही जोडी केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात लोकप्रिय झाली. या चित्रपटाने तब्बल 110 कोटी रुपयांची कमाई केली होती.

सैराट झालं जी.. सर्वाधिक पसंती मिळालेल्या IMDb च्या 250 चित्रपटांमध्ये आर्ची-परश्याची बाजी
Sairat
Image Credit source: Instagram
Follow us on

आयएमडीबीने (IMDb) आतापर्यंतच्या सर्वोत्तम 250 चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेला आणि 2023 मध्ये प्रेक्षक-समिक्षकांनी उचलून धरलेला चित्रपट हा ‘बारवी फेल’ आहे. ‘महाराजा’, ‘कांतारा’ आणि ‘लापता लेडीज’सारख्या आजच्या काळातील हिट्सच्यासोबतच ‘जाने भी‌ दो यारों’, ‘पेरीयेरुम पेरुमल’ आणि ‘पथेर पांचाली’ अशा अभिजात कलाकृतींचाही त्यात समावेश आहे. IMDb वर या 250 चित्रपटांना एकत्रित 85 लाखांपेक्षा जास्त वोट्स मिळाले आहेत. इतकंच नव्हे तर संपूर्ण भारतभर ज्या चित्रपटाने सगळ्यांना याड लावलं असा ‘सैराट’देखील या यादीत समाविष्ट आहे.

‘सैराट’ या यादीत सत्तराव्या स्थानी आहे. 2024 मधील ‘महाराजा’, ‘मैदान’, ‘द गोट लाईफ’, ‘लापता लेडीज’ आणि ‘मंजुमेल बॉइज’ हे पाच चित्रपटसुद्धा या यादीत आहेत. या चित्रपटांमधील सर्वांत जुना चित्रपट हा 1955 मध्ये प्रदर्शित झालेला सत्यजीत रे यांचा ‘पथेर पांचाली’ हा आहे. या यादीत दिग्दर्शक मणीरत्नम यांचे सर्वाधिक सात चित्रपट आहेत. त्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे सहा चित्रपट आहेत.

हे सुद्धा वाचा

या यादीमध्ये ’12th फेल’ हा चित्रपट सर्वोच्च स्थानी आल्याचा आनंद व्यक्त करताना विक्रांत मेस्सीने शूटिंगदरम्यानचा एक प्रसंग सांगितला. “चित्रपटात मनोज आणि त्याची आई या दोघांवर चित्रीत झालेला चंपीचा प्रसंग आहे. तो चित्रपटातील अतिशय महत्त्वाचा प्रसंग आहे. कारण त्यामुळे मनोजला कळतं की, त्याची आजी वारली‌ आहे. या सीनमध्ये एक दरवाजापलीकडे हलकासा प्रकाश आहे. संध्याकाळी फक्त पाच ते सात मिनिटंच असा प्रकाश असतो. विधू विनोद चोप्रा सर आणि डीओपी रंगराजन रामाबद्रन यांनी खूप आधी या शूटचं नियोजन केलं होतं. सेटवर आम्हा कलाकारांना अतिशय अचूक काम करावं लागलं, कारण तो प्रसंग चित्रीत करण्यासाठी आमच्याकडे अवघे काही मिनिटं होती. गीताजी आणि मी या भावनिक ओलावा असलेल्या प्रसंगासाठी ग्लिसरीन न वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हे एक मोठं आव्हान होतं. त्यासाठी अनेक रिहर्सल्स लागल्या, परंतु नंतर आम्हाला ते शूट करण्यात यश मिळालं.”