तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत सोढीच्या भूमिकेतून सर्वांचे मनोरंजन करणारा अभिनेता अर्थात गुरुचरण सिंग याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. सर्वात हैराण करणारे म्हणजे अभिनेता गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. अभिनेता नेमका कुठे आहे, याबद्दल कोणालाही काहीच कल्पना नाहीये. गुरुचरण सिंगची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आता नुकताच गुरुचरण सिंगबद्दल एक मोठी माहिती मिळताना दिसत आहे. ज्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे.
गुरुचरण सिंगच्या मित्राने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून गुरुचरण सिंगची तब्येत खराब होती. गुरुचरण सिंगच्या मित्राने म्हटले की, गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यापासून त्याचे आई वडिल चिंतेत असून त्यांनी दिल्लीमध्ये तक्रार देखील दाखल केलीये. पोलिस हे सध्या गुरुचरण सिंगचा शोध घेत आहेत. आम्ही सतत गुरुचरण सिंगच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत.
गुरुचरण सिंगच्या मित्राचे म्हणणे आहे की, दिल्लीला जाण्यापूर्वी त्याचा बीपी जास्त होता आणि त्याने काही तपासण्या देखील केल्या होत्या. हेच नाही तर दिल्लीला जाण्यापूर्वी त्याने जेवणही व्यवस्थित केले नव्हते. यामुळे चिंता अधिक वाढली आहे. गुरुचरण सिंगसोबत तारक मेहता मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीला याबद्दल विचारण्यात आले.
जेनिफर मिस्त्री म्हणाली की, गेल्या काही दिवसांपासून मी गुरुचरण सिंगच्या संपर्कात नव्हते. गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्याचे ऐकल्यापासून मला मोठा धक्काच बसला. गुरुचरण सिंग हा सुरक्षित घरी यावा. पुढे जेनिफर मिस्त्री म्हणाली की, जूननंतर आम्ही संपर्कात नव्हतो. जेनिफर मिस्त्री हिने देखील तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली आहे.
गेल्या काही वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला कलाकार हे सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. हेच नाही तर जेनिफर मिस्त्री हिने तर थेट असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गुरुचरण सिंगने देखील मालिका सोडलीये. आजही गुरुचरण सिंगला लोक सोढी याच नावाने ओळखतात. गुरुचरण सिंग सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो.