‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इमरान खान हा नुकताच मुंबईतील एका फ्लॅटमध्ये भाडेतत्त्वावर राहू लागला. गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनसोबत त्याने मुंबईतील वांद्रे परिसरात असलेला निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा फ्लॅट तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतला आहे. या फ्लॅटचं महिन्याचं भाडं तब्बल 9 लाख रुपये इतकं आहे. केवळ इमरानच नव्हे तर बॉलिवूडमध्ये असे इतरही सेलिब्रिटी आहेत, जे प्रचंड पैसा कमावूनही मुंबईत स्वत:चं घर विकत घेण्यापेक्षा भाडेतत्त्वावर राहणं पसंत करतायत. यात क्रिती सनॉन, कार्तिक आर्यन, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचाही समावेश आहे. याशिवाय असेही काही सेलिब्रिटी आहेत, जे फक्त भाडेतत्त्वावर देण्यासाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत आहेत.
इंडस्ट्रीतील काही कलाकार घर विकत घेऊ शकत असले तरी भाड्याने राहण्यास यासाठी प्राधान्य देतात कारण त्यांना त्यांच्या आवडीनुसार अपार्टमेंट मिळत नाही. त्यामुळे ठराविक परिसरात जर सी-फेसिंग अपार्टमेंट भाडेतत्त्वावर उपलब्ध असेल, तर ते त्याला पसंती देतात. आपल्या आवडीच्या ठिकाणचे अपार्टमेंट विक्रीसाठी उपलब्ध नसल्यामुळेही ते भाड्याने राहण्याला प्राधान्य देतात. “त्यामुळे सर्वोत्तम पर्याय असतो की भाड्याने राहणं. आणखी एक कारण म्हणजे अस्थिर उत्पन्न. यामुळे फ्लॅट किंवा अपार्टमेंट विकत घेण्यावर त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची इच्छा नसते. म्हणूनच काही सेलिब्रिटी भाडेतत्त्वावर राहण्यासाठी पैसे खर्च करायला तयार असतात”, असं ‘झॅप्की’चे सहसंस्थापक संदीप रेड्डी म्हणाले.
जेएलएलचे पश्चिम – उत्तर निवासी सेवा आणि विकासक उपक्रमांचे वरिष्ठ संचालक आणि प्रमुख रितेश मेहता यांच्या मते, “अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हे प्रीमियम सी-फेसिंग अपार्टमेंट्स पसंत करतात. असे अपार्टमेंट्स त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी विक्रीसाठी सहज उपलब्ध नसतात. त्यामुळे ते फ्लॅट भाडेतत्त्वावर घेण्यास प्राधान्य देतात. परंतु त्याचवेळी ते खरेदीसाठी योग्य फ्लॅटचा शोध करत राहतात. जेव्हा त्यांना त्यांच्या आवडीचा अपार्टमेंट सापडतो, तेव्हा ते विकत घेतात. असेही काही कलाकार आहेत, ज्यांना करिअरच्या सुरुवातीलाच अपार्टमेंट विकत घेणं परवडत नाही. शिवाय त्यांची कमाईसुद्धा अनियमित असते. अशावेळी ते भाडेतत्त्वावर राहतात. असे बरेच सेलिब्रिटी आहेत, जे भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नासाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात.”
अभिनेता टायगर श्रॉफने नुकतंच पुण्यात 7.5 कोटी रुपयांची प्रॉपर्टी विकत घेतली. त्यानंतर त्याने ती ताबडतोब 3.5 लाख रुपये दरमहा भाड्याने दिली. 2023 मध्ये रणबीर कपूरने पुण्यातील ट्रम्प टॉवरमध्ये असलेला अपार्टमेंट महिन्याला 4 लाख रुपये या हिशोबाने तीन वर्षांकरिता भाडेतत्त्वावर दिला होता. गेल्या वर्षी सलमान खाननेही वांद्रे पश्चिम इथला फ्लॅट दीड लाख रुपये प्रतिमहिन्याच्या हिशोबाने तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिला होता. यासाठी भाडेकरूने 4.5 लाख रुपयांचा डिपॉझिट भरला होता.
2021 मध्ये अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री क्रिती सनॉनला त्यांचं दोन मजली घर 10 लाख रुपये प्रति महिन्याला भाड्याने दिलं होतं. यासाठी तिने 60 लाख रुपये डिपॉझिट दिले होते. अभिनेता शाहिद कपूरनेही जुहूमधील त्याचं सी-फेसिंग घर कार्तिक आर्यनला 7.5 लाख रुपये प्रति महिना या दराने भाड्याला दिलं होतं. फेब्रुवारी 2023 मध्ये अभिनेत्री मलायका अरोराने अदिती राव हैदरीला 2.31 लाख रुपये प्रति महिना भाड्याने अपार्टमेंट दिला होता.