गोवा: गोव्यात सुरू असलेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ची सोमवारी (28 नोव्हेंबर) सांगता झाली. मात्र या फिल्म फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी असं काही घडलं, जे पाहून सगळेच थक्क झाले. या फिल्म फेस्टिव्हलचे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी मंचावर बोलताना विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर टीका केली. या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इस्रायली चित्रपट निर्माते नदाव यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला असभ्य आणि प्रचारकी चित्रपट असं म्हटलं.
“आम्ही सर्वजण द काश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहिल्यानंतर नाराज आणि आश्चर्यचकीत झालो होतो. हा चित्रपट आम्हाला प्रचाराशिवाय दुसरं काही वाटलं नाही. हा चित्रपट असभ्य होता आणि त्याची कथाही कमकुवत होती. एवढ्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिव्हलसाठी हा चित्रपट पूर्णपणे निरुपयोगी आहे”, असं ते मंचावर सर्वांसमोर म्हणाले.
चित्रपटावर केलेल्या टिप्पणीबद्दल ते पुढे म्हणाले, “मी या मंचावर उभा राहून माझ्या भावना चांगल्या पद्धतीने मांडू शकतोय. अशा प्रकारच्या टिकाटिप्पण्यांना समजून घ्या आणि त्यांना स्वीकारा. कारण त्यासाठी चित्रपट महोत्सव आयोजित केले जातात.”
Jury chairman of the International Film Festival in Goa says that the jury felt “The Kashmir Files was a propaganda film, inappropriate for the film festival”. pic.twitter.com/Sg9HfDOlfk
— Nitin Agarwal (@nitinagarwalINC) November 28, 2022
गेल्या आठवड्यात या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट दाखवण्यात आला होता. विवेक अग्निहोत्रींचा हा चित्रपट या वर्षी 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. इस्लामचा स्वीकार करा, काश्मीर सोडा किंवा मृत्यूला सामोरं जा.. हा नारा देत दहशतवाद्यांनी 1990 मध्ये काश्मीरमधील हिंदूवर हल्ला चढवला होता. काश्मिरी पंडितांना बेघर करून त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मात्र हे सत्य तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे.
या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर त्याची कमाईसुद्धा चांगली झाली. मात्र चित्रपटातून प्रचार केल्याची टीकाही झाली.