नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी एका कलाकाराला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा कलाकार ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिॲलिटी शोचा माजी स्पर्धक वरूण डागर आहे. पैशांसाठी रोडवर परफॉर्म करणाऱ्या वरुणला पोलिसांनी आणि काही प्रेक्षकांनी मारहाण केली आहे. या घटनेनं हादरवून सोडल्याचं त्याने म्हटलं आहे. “मला कोणाचाही तिरस्कार करायचा नाही. पण लोकांच्या मनात इतका द्वेष का आहे याचं मला आश्चर्य वाटतं. या घटनेमुळे मी माझ्या कलेवर कोणताच परिणाम होऊ देणार नाही”, असंही तो ठामपणे म्हणाला.
वरुण दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात परफॉर्म करत होता. तो नेहमीच त्या ठिकाणी परफॉर्म करून पैसे कमावतो. याआधीही त्याला अनेकदा पोलिसांनी अडवलं आणि परफॉर्म न करण्याचा इशारा दिला. मात्र त्याकडे वरुणने फारसं लक्ष दिलं नव्हतं. “त्या परिसरात परफॉर्म करणं कायद्याच्या विरोधात नसल्याने ते आम्हाला थांबवू शकत नाहीत, असा मी विचार केला. परफॉर्मन्सच्या वेळी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच त्यांना राग आला असावा,” असं तो म्हणाला.
काही पार्किंग कर्मचाऱ्यांनीही त्यांच्यावर हल्ला केल्याचं वरुणने सांगितलं. एकाने कॉलर पकडलं आणि दुसऱ्याने गिटार खेचून घेतला. अशा पद्धतीने पोलिसांनी त्याला ओढत व्हॅनकडे नेलं. “मला त्यांनी मारहाण केली, माझे केस ओढले. मी गुन्हेगार असल्यासारखी वागणूक त्यांनी मला दिली”, अशा शब्दांत त्याने राग व्यक्त केला.
सोशल मीडियावर वरुणचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्यात पोलिसांवर टीका करत वरुणची बाजू घेतली आहे. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीसुद्धा वरुणला पाठिंबा दिला आहे. यामध्ये अली गोणी आणि राजेश तेलंग यांचा समावेश आहे. ‘चोराला पकडा, गँगस्टरला पकडा, ड्रग तस्कऱ्याला पकडा.. पण एक कलाकार जो चांगलं काम करून पैसे कमावण्याचा प्रयत्न करतोय, त्याला पकडू नका. तुम्हाला लाज वाटली पाहिजे’ असं अली गोणीने लिहिलंय.
अभिनेता राजेश तैलंगनेही या घटनेचा विरोध केला आहे. ‘कोणत्याही कलाकाराला अशी वागणूक मिळू नये. दिल्लीचा नागरिक असल्याची मला लाज वाटतेय. लाज बाळगा दिल्ली पोलीस’, असं त्याने लिहिलंय. दरम्यान एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, “कॅनॉट प्लेसच्या व्यापारी संघटनेने या कलाकारांमुळे अडथळा होत असल्याचं ट्विट केलं होतं. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. वरुण डागरसारख्या बस्कर्समुळे त्या परिसराला भेट देणाऱ्या लोकांना तिथे वावरताना अडथळा निर्माण होतो. आजूबाजूला गर्दी जमते.”