अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने काही महिन्यांपूर्वी प्रियकर नुपूर शिखरेशी लग्न केलं. आयरा ही मेंटल हेल्थ सपोर्ट ऑर्गनायझेशनची संस्थापक आणि सीईओ आहे. ती अनेकदा मानसिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयरा तिच्या आईवडिलांच्या घटस्फोटाविषयी आणि त्याकाळात तिचं मानसिक आरोग्य कसं होतं, याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आमिरने 18 एप्रिल 1986 रोजी रिना दत्ताशी लग्न केलं होतं. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. पण 2002 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर आमिर आणि रिना विभक्त झाले. त्यानंतर आमिरने किरण रावशी 2005 मध्ये दुसरं लग्न केलं. आमिरचं हे दुसरं लग्नही टिकलं नाही. 2021 मध्ये किरण आणि आमिरने घटस्फोट घेतला.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आयराने सांगितलं की तिच्या पालकांच्या घटस्फोटाचा तिच्या मानसिक आरोग्यावर विशेष परिणाम झाला नाही. ती म्हणाली, “ते कधीच आमच्यासमोर भांडले नाहीत. मुलांसाठी दोघं नेहमी एकत्र यायचे आणि त्यांच्या स्वत:च्या तक्रारी दूर ठेवायचे. त्यांच्या नात्यात समस्या असूनही ते कुटुंब म्हणून नेहमी सोबत असायचे.”
याविषयी आयरा पुढे म्हणाली, “मला वाटलं नव्हतं की घटस्फोटसुद्धा माझ्यावर नकारात्मक परिणाम करणारी गोष्ट असू शकते. मला मोठी झाल्यानंतर समजलं की नातेसंबंध योग्य पद्धतीने संपवणंही खूप गरजेचं असतं. ते कदाचित चांगल्यासाठी संपलं असेल. माझ्या आईवडिलांचं नातंही चांगल्यासाठीच संपलं असेल. मी जेव्हा माझ्या डॉक्टरांशी चर्चा केली तेव्हा मला समजलं की कोणालाही दोष देण्याची गरज नाही. जे घडलं ते स्वीकारता आलं पाहिजे. आपली मुलं सुरक्षित राहावीत यासाठी त्यांनीही बराच त्याग केलाय. ते विभक्त होत असले तरी आम्हाला समान प्रेम मिळेल याची खात्री त्यांनी केली.”
आमिरला पहिल्या पत्नीपासून आयरा ही मुलगी आणि जुनैद हा मुलगा आहे. तर किरण राव आणि आमिर यांना आझाद हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही आमिरने दोन्ही पूर्व पत्नींसोबत मैत्रीचं नातं जपलं आहे. पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी हे तिघं अनेकदा एकत्र येताना दिसतात.