इराण- ‘झोम्बी अँजेलिना जोली’ या नावाने इन्स्टाग्राम स्टार झालेल्या सहर तबरने अखेर आपल्या चेहऱ्यावरून पडदा उचलला आहे. 2019 मध्ये सहरने प्लास्टिक सर्जरी करत तिचा चेहरा हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीसारखा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सर्जरीनंतर तिचा चेहरा आणखीनच भयंकर दिसू लागला. त्यामुळे तिला ‘झोंबी अँजेलिना जोली’ असं नाव मिळालं. इन्स्टाग्रामवर ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता तिने आपला खरा चेहरा सर्वांना दाखवल्याने नेटकरी थक्क झाले आहेत.
सहर ही इराणमधील तेहरान इथं राहणारी आहे. तिचं खरं नाव फतेमेह खिशवंद आहे. 2019 मध्ये तिला ईश्वरनिंदेच्या आरोपाखाली इराणमध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी तिला 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते मसीह अलीनेजाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 महिन्यांच्या तुरुंगवासानंतर सहरची सुटका करण्यात आली. 21 वर्षांच्या सहरने आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपला खरा चेहरा सर्वांसमोर आणला आहे.
याआधी इन्स्टाग्रामवर सहरचा जो चेहरा नेटकऱ्यांसमोर आला होता, तो फक्त मेक-अप आणि फोटोशॉपचा परिणाम होता असंही तिने स्पष्ट केलं. सहरने कॉस्मेटिक सर्जरी केली म्हणून तिचा चेहरा अँजेलिना जोलीसारखा दिसत होता, अशी चर्चा होती. मात्र ते सर्व खोटं असल्याचं तिने म्हटलंय.
“लहानपणापासूनच माझं प्रकाशझोतात येण्याचं स्वप्न होतं. इंटरनेट हा सगळ्यात सोपा मार्ग होता. म्हणून अँजेलिनासारखा मेकअप आणि फोटोशॉप करून फोटो पोस्ट केले होते,” असं तिने सांगितलं.