दिवंगत अभिनेता इरफान खानने आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. इरफानचं कॅन्सरने निधन झालं. त्याचा मुलगा बाबिलसुद्धा वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात काम करतोय. आता बाबिलच्या स्वभावानेही नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. युट्यूबर प्रेम कुमारला त्याने 50 हजार रुपयांची देणगी दिली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात पाणी टंचाईविरोधात हा युट्यूबर काम करत आहे. त्याच्यासाठी त्याने ही देणगी दिली. एका पापाराझी अकाऊंटवर बाबिलचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तो युट्यूबरच्या अकाऊंटमध्ये फोनद्वारे पैसे ट्रान्सफर करताना दिसून येत आहे. “माझं नाव लिहिण्याची गरज नाही, तू चांगलं काम करतोय”, असं बाबिल त्या युट्यूबरला म्हणतो.
बाबिलच्या या परोपकारी कृत्याचं नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. ‘खूप चांगलं काम करतोय तू. देव तुझं भलं करो’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा वडिलांसारखाच उदार मनाचा आहे’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने कौतुक केलं. विशेष म्हणजे बाबिलने ज्यादिवशी ही देणगी दिली, त्याच तारखेला म्हणजेच 29 एप्रिल रोजी त्याचे वडील इरफान खान यांचं निधन झालं होतं. वडिलांच्या स्मृतिदिनी बाबिलने त्यांचे काही फोटो पोस्ट करत भावनिक पोस्ट लिहिली होती. “तुम्ही मला योद्धा म्हणून लढायला शिकवलं पण प्रेम आणि विनम्र स्वभावाने. तुम्ही मला आशेबद्दल आणि लोकांसाठी लढायला शिकवलं. तुमचे चाहते नाहीत तर तुमचं कुटुंबच आहे. मी तुम्हाला वचन देतो की आपल्या लोकांसाठी आणि कुटुंबासाठी मी लढेन. मी हार मानणार नाही”, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.
काही दिवसांपूर्वीच बाबिलची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली होती. ‘कधी कधी मला असं वाटतं की सर्वकाही सोडून द्यावं आणि बाबांकडे निघून जावं’, असं त्याने लिहिलं होतं. ही पोस्ट वाटून अनेकांनी त्याच्याविषयी काळजी व्यक्त केली होती. बाबिलने अशी निराशाजनक पोस्ट का लिहिली आणि बाबांकडे जाण्याविषयी का म्हटलंय, असा प्रश्न अनेकांनी विचारला होता.
बाबिलने ‘कला’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘द रेल्वे मॅन’ या वेब सीरिजमधील त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. यामध्ये त्याने आर. माधवन, के. के. मेनन, दिव्येंदु यांच्यासोबत भूमिका साकारल्या होत्या. लवकरच तो शूजित सरकारच्या ‘द उमेश क्रॉनिकल्स’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.