चौकटीबाहेरच्या भूमिका साकारून आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता म्हणजे इरफान खान. इरफान खानच्या निधनाची घटना अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. 29 एप्रिल 2020 रोजी त्याने या जगाचा अखेरचा निरोप घेतला. इरफानच्या निधनानंतर त्याचा मुलगा बाबिलने अनेकदा सोशल मीडियाद्वारे, विविध कार्यक्रमांमध्ये वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. वडिलांसाठी त्याने अनेकदा सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिल्या आहेत. अशातच त्याने नुकतीच लिहिलेली पोस्ट वाचून चाहत्यांच्या मनात विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. बाबिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट लिहिली होती आणि त्यानंतर त्याने ती लगेच डिलिटसुद्धा केली होती. त्यामुळे बाबिलला नेमकं काय झालंय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
बाबिलने मंगळवारी रात्री उशिरा त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट लिहिली होती. त्यानंतर ती लगेच त्याने डिलिट केली. मात्र तोपर्यंत त्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची ही पोस्ट वाचल्यानंतर चाहत्यांनी त्याच्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये बाबिलने लिहिलं होतं, ‘कधी कधी मला असं वाटतं की सर्वकाही सोडून द्यावं आणि बाबांकडे निघून जावं.’ हीच पोस्ट वाटून अनेकांनी त्याच्याविषयी काळजी व्यक्त केली. बाबिलने अशी निराशाजनक पोस्ट का लिहिली आणि बाबांकडे जाण्याविषयी का म्हटलंय, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.
इरफानप्रमाणेच त्याचा मुलगा बाबिलसुद्धा अभिनयक्षेत्रात सक्रिय आहे. त्याने ‘कला’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘द रेल्वे मॅन’ या वेब सीरिजमधील त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. यामध्ये त्याने आर. माधवन, के. के. मेनन, दिव्येंदु यांच्यासोबत भूमिका साकारल्या होत्या. लवकरच तो शूजित सरकारच्या ‘द उमेश क्रॉनिकल्स’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
त्याने त्याच्या 30 हून अधिक वर्षांच्या कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. 1988 मध्ये ‘सलाम बॉम्बे’मध्ये छोटी भूमिका साकारत त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने ‘हासिल’, ‘मकबूल’, ‘पान सिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘पिकू’, ‘लाइफ ऑफ पाय’, ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 2020 मध्ये इरफान खानचं कॅन्सरने निधन झालं.