केरळ: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. केरळ आणि तमिळनाडूच्या आयकर विभागाने काही नामांकित मल्याळम चित्रपट निर्मात्यांच्या आणि अभिनेत्यांच्या घरावर छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून एर्नाकुलम जिल्ह्यात ही कारवाई केली जातेय. या छापेमारीत अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडून कोणतीच मदत घेतली नाही. यामुळे या छाप्यांच्या कारवाईबद्दल भुवया उंचावल्या जात आहेत.
प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमारन याच्या घरापासून छापेमारीची सुरुवात झाली. इतर नामांकित निर्माते अँटनी पेरुंबवुर, अँटो जोसेफ आणि लिस्टिन स्टीफन यांच्याही घरावर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. छापेमारीची ही कारवाई सकाळी 7.45 वाजताच्या सुमारास सुरू झाली आणि संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरूच होती.
या संपूर्ण घटनेबद्दल कमालीची गुप्तता पाळली जात आहे. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या यशात निर्माते अँटनी पेरुंबवुर यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण मोहनलाल यांच्या बहुतांश चित्रपटांची निर्मिती त्यांनीच केली होती. तर जोसेफ यांचं सुपरस्टार ममूटी यांच्यासोबत जवळचं नातं आहे.
‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या मैत्री कंपनीच्या मालकासह त्यांच्याशी संबंधित इतरांवरही आयटी विभागाने छापे टाकले आहेत. यलमंचिली रविशंकर, नवीन अर्नेनी आणि चेरूकुरू यांच्या कार्यालयांसह पंधरा ठिकाणी ही मोठी कारवाई झाली आहे. मैत्री या निर्मिती कंपनीने पुष्पा, श्रीमंतुडू यांसारख्या तेलुगू चित्रपटांची निर्मिती केली.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील या मोठ्या निर्मिती कंपन्यांनी करचुकवेगिरी केली का, याचा तपास आयकर विभागाचे अधिकारी करत आहेत. पृथ्वीराज सुकुमारन, मोहनलाल, ममूटी ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील खूप मोठी नावं आहेत. त्यामुळे या कारवाईची विशेष चर्चा होत आहे.