मुंबई: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही बॉलिवूडमधल्या ब्युटी क्वीन्सपैकी एक आहे. जॅकलिनच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा आहेत. तिने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. बॉलिवूड चित्रपटांमधील ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिनने 2006 मध्ये श्रीलंका मिस युनिव्हर्सचाही किताब जिंकला होता. याच सौंदर्यस्पर्धेतील तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओवरून नेटकरी जॅकलिनला खूप ट्रोल करत आहेत.
मिस युनिव्हर्स श्रीलंकाच्या सौंदर्यस्पर्धेत जॅकलिनला कॉस्मेटिक सर्जरीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. जॅकलिनचं उत्तर नेटकऱ्यांना खोटं वाटतंय आणि त्यामुळेच तिच्यावर टीका होत आहे.
कॉस्मेटिक सर्जरीबद्दलच्या प्रश्नावर जॅकलिन म्हणाली होती, “माझ्या कॉस्मेटिक सर्जरी हा एक अयोग्यप्रकारे उचललेला फायदा आहे. कारण मला ते सौंदर्यस्पधेच्या विरोधात वाटतं. महिलांच्या नैसर्गिक सौंदर्याचं कौतुक आपण केलं पाहिजे. हे सुद्धा महत्त्वाचं असतं की कोण त्याचा खर्च उचलू शकतो आणि कोण नाही. मात्र सौंदर्यस्पर्धांचा अर्थ कॉस्मेटिक सर्जरी नक्कीच नाही.”
जॅकलिनच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हाहाहा.. पहा कोण बोलतंय’ अशी उपरोधिक टिप्पणी एका युजरने केली. तर ‘आता ही स्वत: किती वेगळी दिसते. तिला ओळखायलाच मला वेळ लागला’, असं दुसऱ्याने लिहिलंय.
गेल्या काही दिवसांपासून जॅकलिन ही 200 कोटींच्या खंडणी प्रकरणामुळेही चर्चेत आहे. तिहार तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप तिच्यावर आहे.
जॅकलिन नुकतीच ‘राम सेतू’ या चित्रपटात झळकली होती. तिचा आगामी ‘सर्कस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती रणवीर सिंग आणि पूजा हेगडेसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.