मुंबई: 7 फेब्रुवारी 2024 | निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांचा ‘सारांश’ हा चित्रपट 1984 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. ‘सारांश’ची कथा पाहून महेश भट्ट यांना गजलसम्राट जगजीत सिंह यांची आठवण येते. कारण त्यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं होतं. जगजीत सिंह यांच्या मुलाचं निधन गाडीच्या अपघातानेच झालं होतं. निधनानंतर मुलाचं पार्थिव मिळवण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला होता. महेश भट्ट यांनी बऱ्याच वर्षांनंतर याचा खुलासा केला आहे. ‘सारांश’ या चित्रपटात अनुपम खेर आणि रोहिणी हट्टंगडी यांनी वृद्ध जोडप्याची भूमिका साकारली होती. त्यांच्या तरुण मुलाचं निधन होतं. वृद्धापकाळातील एकटेपणा, दु:ख आणि यंत्रणेतील भ्रष्टाचार याचं चित्रण ‘सारांश’मध्ये करण्यात आलं आहे.
या चित्रपटाला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महेश भट्ट, अनुपम खेर यांची उपस्थिती होती. यावेळी महेश भट्ट यांनी जगजीत सिंह यांच्या मुलाच्या दुर्घटनेचा उल्लेख केला होता. “जेव्हा जगजीत सिंह यांच्या मुलाचं एका अपघातात निधन झालं होतं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की मुलाचं पार्थिव मिळवण्यासाठी त्यांना ज्युनिअर अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागली होती”, असं त्यांनी सांगितलं. हे ऐकल्यानंतर महेश भट्ट यांना ‘सारांश’चं महत्त्व समजलं. “एका सर्वसामान्य व्यक्ती आपल्या मुलाच्या पार्थिवासाठी असा संघर्ष करतो”, असं ते पुढे म्हणाले.
जगजीत सिंह आणि त्यांची पत्नी चित्रा यांचा एकुलता एक मुलगा विवेकचं 1990 मध्ये कार अपघातात निधन झालं होतं. त्यावेळी त्यांच्या मुलाचं वय 20 वर्षे होतं. जगजीत सिंग यांची पत्नीसुद्धा प्रसिद्ध गायिका होती. त्यांनी मुलाच्या निधनानंतर पूर्णपणे गायकी सोडली. जगजीत सिंह यांनी ‘चिट्ठी ना कोई संदेश’ या गाण्यातून आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या. आपल्या मुलाच्या स्मरणार्थ त्यांनी हे गाणं गायलं होतं. आजही हे गाणं अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणतं.