मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना बेला बोस यांचं सोमवारी निधन झालं. त्या 79 वर्षांच्या होत्या. बेला बोस यांनी साठ-सत्तरच्या दशकांत अनेक हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. त्या मणिपुरी नृत्यशैलीत पारंगत होत्या. मात्र अभिनेत्री आणि नृत्यांगना इतकीच त्यांची ओळख मर्यादित नव्हती. त्या उत्तम चित्रकार, कवयित्री आणि जलतरणपटूही होत्या. आपल्या बोलक्या आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वामुळे त्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत्या.
बेला बोस या मूळच्या कोलकात्यातील होत्या. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्या मुंबईत स्थायिक झाल्या होत्या. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी नृत्यांगना म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मै नशे मै हूँ’ या चित्रपटात राज कपूर यांच्याबरोबर एका गाण्यातील नृत्यासाठी त्यांची निवड झाली होती. बंगाली रंगभूमीवर काम करत त्यांनी अभिनयाची कला अवगत केली. 1962 मध्ये त्यांनी ‘सौतेला भाई’ या चित्रपटात पहिल्यांदा गुरु दत्त यांची नायिका म्हणून मुख्य भूमिका साकारली.
बेला बोस यांचं लग्न अभिनेते आणि दिग्दर्शक असीस कुमार यांच्याशी झालं होतं. त्यांचा जन्म कोलकालामधील एका संपन्न कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील कपड्याचे व्यापारी होते, तर आई गृहिणी होती. एका बँक क्रॅशच्या घटनेनंतर बेला यांच्या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळलं. त्यानंतर त्या मुंबईत आल्या. मात्र त्याच्या काही काळानंतर बेला यांच्या वडिलांचं एका अपघातात निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर बेला यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. शिक्षण सुरू ठेवत त्यांनी शाळेतच डान्सचा ग्रुप जॉईन केला आणि ठिकठिकाणी परफॉर्म करू लागल्या.
हेलन, अरुणा इराणी यांच्याप्रमाणेच नृत्यांगना म्हणून त्यांना हिंदी सिनेसृष्टीत ओळख मिळाली. बेला यांनी जवळपास दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘आम्रपाली’, ‘बंदिनी’, ‘उमंग’, ‘प्रोफेसर’, ‘दिल और मोहब्बत’, ‘जिंदगी और मौत’ अशा काही चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तर ‘जय संतोषी माँ’ या गाजलेल्या पौराणिक चित्रपटात त्यांनी साकारलेली खलनायकी भूमिका प्रेक्षकांना आजही लक्षात आहे.