Jai Santoshi Maa: 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जय संतोषी मां’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. आजही सिनेमा आणि सिनेमातील गाणी कोणी विसरू शकलेलं नाही. आता सिनेमातील प्रसिद्ध सेलिब्रिटीबद्दल दुःखद बातमी समोर येत आहे. ‘जय संतोषी मां’ सिनेमातील निर्माते दादा सतराम रोहरा यांचं निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी दादा सतराम रोहरा यांनी अखेरचा श्वास घेतला. दादा सतराम रोहरा हे सिंधी समाजातील मोठं नाव होते. रेडिओ सिंधीने इन्स्टाग्रामवर सतराम रोहरा यांच्या निधनाची माहिती दिली.
दादा सतराम रोहरा हे एक गायक देखील होते. त्यांनी अनेक हिट सिनेमांची निर्मिती केली होती, ज्यात ‘जय संतोषी मां’ आणि ‘हाल ता भाजी हालूं’ सारख्या नावांचा समावेश आहे. दादा सतराम रोहरा यांच्या निधनानंतर सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहते दादा सतराम रोहरा यांनी श्रद्धांजली वाहत आहेत.
‘दादा सतराम रोहरा यांनी ब्लॉकबास्टर सिंधी सिनेमा हाल ता भाजी हालूं’ आणि हिंदी सिनेमा ‘जय संतोषी मां’ सिनेमांची निर्मिती केली होती. महान गायिका लता मंगेशकर यांना सिंधी गाणं गाण्यासाठी पटवून देणारे ते एकमेव व्यक्ती आहेत. दादा सतराम रोहरा यांच्या निधनाने सिंधी समाजाची मोठी हानी झाली असून त्यांची पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही.’ असं देखील पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.
16 जून, 1939 रोजी सिंधी कुटुंबात जन्मलेल्या दादा सतराम रोहरा यांनी 1996 मध्ये ‘शेरा डाकू’ सिनेमाच्या माध्यमातून प्रॉडक्शन विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. रॉकी मेरा नाम’, ‘घर की लाज’, ‘नवाब साहिब’ आणि ‘जय काली’ यांसऱ्या सिनेमांची त्यांनी निर्मिति केली. दादा सतराम रोहरा यांच्या ‘जय संतोषी मां’ सिनेमाने तर, ‘शोले’ सिनेमाचे देखील रेकॉर्ड मोडले आहेत.
‘जय संतोषा मां’ सिनेमा 1975 मध्ये प्रदर्शित झाला तेव्हा या सिनेमाने अनेक विक्रम रचले, जे आजपर्यंत कोणताही सिनेमा करू शकला नाही. लोक थिएटरमध्ये सिनेमा पाहताना पैसे आणि फुलांचा वर्षाव करत असत. या सिनेमात अनिता गुहाने माँ संतोषीची भूमिका साकारली होती आणि खऱ्या आयुष्यातही लोक अभिनेत्रीची पूजा करू लागले होते.
‘जय संतोषी मां’ हा 1975 मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले. रिपोर्ट्सनुसार, ‘जय संतोषी मां’चे बजेट फक्त 5 लाख रुपये होते, पण त्यावेळी सिनेमा जवळपास 5 कोटी रुपये कमावले होते, जे आजच्या तुलनेत 100 पट जास्त आहे.