मुंबई: 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’ या चित्रपटातील जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्सने जगभरातील प्रेक्षकांना थक्क केलं होतं. त्यावेळी स्पेशल इफेक्ट्स असलेले चित्रपट मोठ्या प्रमाणावर बनवले जात नव्हते. त्यामुळे ‘अवतार’ जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांनी थिएटर्समध्ये तुंबड गर्दी केली होती. या चित्रपटाच्या कमाईचा विक्रम आजही अबाधित आहे. आता 13 वर्षांनंतर या चित्रपटाला सीक्वेल ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या शुक्रवारी जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार 2’ चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ज्यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षावच केला. त्यामुळे पहिल्या वीकेंडलाही हा चित्रपट थिएटरमध्ये चांगलीच गर्दी खेचणार असल्याचा अंदाज आहे.
बॉक्स ऑफिसच्या रिपोर्ट्सनुसार, अवतार 2 ने शुक्रवारी अपेक्षेपेक्षा अधिक कमाई करत बंपर ओपनिंग केली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल 38 ते 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अंतिम कलेक्शनची माहिती मिळाल्यानंतर हा आकडा 41 कोटींपर्यंतही जाऊ शकतो.
अवतार 2 ला जरी जबरदस्त ओपनिंग मिळाली असली तरी ‘ॲव्हेंजर्स: एंड गेम’चा विक्रम हा मोडू शकला नाही. या चित्रपटाने तब्बल 53 कोटी रुपये कमावले होते. भारतात सर्वात मोठी ओपनिंग करणाऱ्या हॉलिवूड चित्रपटांच्या यादीत अवतार 2 हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
1- ॲव्हेंजर्स: एंड गेम- 53.10 कोटी रुपये
2- अवतार: द वे ऑफ वॉटर- 38 कोटी रुपये
3- स्पायडरमॅन: नो वे होम- 32.67 कोटी रुपये
4- ॲव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर- 31.30 कोटी रुपये
5- डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस- 27.50 कोटी रुपये
अवतार 2 ची शनिवारची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा चांगली झाली. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा कमाईचा आकडाही 40 कोटींपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज आहे. कमाईचा हाच वेग राहिल्यास पहिल्या वीकेंडलाच ‘अवतार 2’ 150 कोटींचा टप्पा पार करू शकेल.
भारतात हा चित्रपट 3 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होतोय. या साय-फाय जॉनरच्या चित्रपटाचा बजेट निर्मात्यांनी अधिकृतपणे जाहीर केला नाही. मात्र तो तब्बल 350 दशलक्ष डॉलर्समध्ये बनवला गेल्याचं म्हटलं जातंय. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वांत महागडा चित्रपट ठरतोय. भारतातही अवतारची बरीच क्रेझ पहायला मिळते.