‘तू तर दलित आहेस’ म्हणणाऱ्याला जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडने चांगलंच सुनावलं, म्हणाला ‘खरंच अस्पृश्य..’

| Updated on: Mar 18, 2025 | 10:58 AM

जातीवरून टिप्पणी करणाऱ्या एका युजरला जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडने चांगलंच सुनावलं आहे. शिखर पहाडियाच्या एका फोटोवर नेटकऱ्याने जातीवाचक टिप्पणी केली होती. शिखर हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.

तू तर दलित आहेस म्हणणाऱ्याला जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडने चांगलंच सुनावलं, म्हणाला खरंच अस्पृश्य..
शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाने सोशल मीडियावर एका युजरला चांगलंच सुनावलं आहे. संबंधित युजरने शिखरच्या एका फोटोवर जातीवाचक टिप्पणी केली होती. गेल्या वर्षीच्या दिवाळी सेलिब्रेशनचा एक फोटो शिखरने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. यामध्ये त्याच्यासोबत जान्हवी आणि त्यांचे पाळीव श्वान दिसून आले होते. याच फोटोवर एका युजरने कमेंट केली की, ‘पण तू तर दलित आहेस.’ याच कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत शिखरने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शिखरने लिहिलं, ‘2025 मध्येही तुझ्यासारखे इतक्या लहान, मागासलेल्या विचारसरणीचे लोक आहेत, हे खरंच दुर्दैवी आहे. दिवाळी हा प्रकाश, प्रगती आणि एकता-संकल्पनांचा उत्सव आहे, जो तुझ्या मर्यादित बुद्धीच्या पलीकडचा आहे. भारताची ताकद नेहमीच त्याच्या विविधतेत आणि सर्वसमावेशकतेत राहिली आहे, जे अर्थातच तुला समजलं नाही. अशा पद्धतीचं अज्ञान पसरवण्याऐवजी तू स्वत:ला शिक्षित करण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. कारण सध्या इथं खरोखरं अस्पृश्य असलेली एकमेव गोष्ट म्हणजे तुझ्या विचारसरणीची पातळी आहे.’

हे सुद्धा वाचा

शिखर पहाडिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याची आई स्मृती शिंदे या अभिनेत्री आहेत. तर मोठा भाऊ वीर पहाडियाने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. अक्षय कुमारच्या ‘स्कायफोर्स’ या चित्रपटातून त्याने अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. यामध्ये त्याने अक्षय कुमार, सारा अली खान आणि निम्रत कौर यांच्यासोबत भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिखर आणि जान्हवी एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी माध्यमांसमोर कधी प्रेमाची जाहीर कबुली दिली नसली तरी त्यांना विविध पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये, चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान एकत्र पाहिलं गेलं. इतकंच नव्हे तर जान्हवी आणि शिखरच्या आईने एकत्र सिद्धिविनायक गणपतीचं दर्शनसुद्धा घेतलं होतं.

एका मुलाखतीत जान्हवीने शिखरविषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. “मी 15-16 वर्षांची असल्यापासून तो माझ्या आयुष्यात आहे. माझ्या मते माझी स्वप्नं ही नेहमीच त्याची स्वप्नं राहिली आहेत आणि त्याची स्वप्नं ही नेहमीच माझी आहेत. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. जणू आम्ही एकमेकांनाच लहानाचं मोठं केलंय, अशा पद्धतीने आम्ही एकमेकांची साथ देतो”, असं ती म्हणाली होती.