अभिनेत्री जान्हवी कपूर ही राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाला डेट करत असल्याचं जगजाहीर आहे. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलंय. इतकंच नव्हे तर खुद्द जान्हवीने अप्रत्यक्षपणे तिच्या नात्याची कबुली दिली आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये जान्हवीने खुलासा केला होता की, शिखरचा फोन नंबर तिच्या स्पीड डायल लिस्टमध्ये आहे. त्यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवीच्या गळ्या शिखरच्या नावाचं लॉकेट पहायला मिळालं. नुकतंच जान्हवीने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी कॉमेडियन कपिल शर्माने तिला शिखरवरून चिडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जान्हवीनेही थेट उत्तर दिलं.
जान्हवीचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये ती राजकुमार रावसोबत मुख्य भूमिकेत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त जान्हवी आणि राजकुमार कपिलच्या शोमध्ये पोहोचले होते. चित्रपटात जान्हवी आणि राजकुमारने पती-पत्नीची भूमिका साकारल्याने, कपिल त्यांच्याशी लाइफ पार्टनरबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तो राजकुमारसोबत एकाच क्षेत्रात काम करणारा पार्टनर निवडण्याचं महत्त्व काय असतं, याविषयी चर्चा करत असतो. राजकुमार कपिलशी सहमत असतो. त्याचवेळी संधी साधत कपिल जान्हवीला शिखरच्या नावावरून चिडवण्याचा प्रयत्न करतो. “तुलासुद्धा फिल्म इंडस्ट्रीमधील पार्टनर हवा की आता तू ज्या शिखरावर आहेस, तिथे खुश आहेस”, असा रंजक प्रश्न कपिल जान्हवीला विचारतो.
कपिलच्या तोंडून शिखर हे नाव ऐकताच जान्हवीच्या चेहऱ्यावर हसू येतं. ती पुढे म्हणते, “मी सध्या ज्या शिखरावर आहे, तिथे खुश आहे.” या शोमध्ये कपिल हा जान्हवी आणि राजकुमारसोबत इतरही विषयांवर गमतीशीर चर्चा करतो. याआधीही जान्हवी शिखरविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्याचं पहायला मिळालं. “मी 15-16 वर्षांची असल्यापासून तो माझ्या आयुष्यात आहे. माझ्या मते माझी स्वप्नं ही नेहमीच त्याची स्वप्नं राहिली आहेत आणि त्याची स्वप्नं ही नेहमीच माझी आहेत. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. जणू आम्ही एकमेकांनाच लहानाचं मोठं केलंय, अशा पद्धतीने आम्ही एकमेकांची साथ देतो”, असं ती एका मुलाखतीत शिखरविषयी म्हणाली होती.
शिखर पहाडिया हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आहे. स्मृती शिंदे या सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात.