दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर अनेकदा स्टारकिड असल्याने नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते. स्टारकिड असल्याने जान्हवीला काही संधी सहज प्राप्त झाल्या तरी त्याचे नकारात्मक परिणामसुद्धा तिला भोगावे लागले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने एक जुनी घटना सांगितली. त्यावेळी ती 12-13 वर्षांची होती आणि आईवडिलांसोबत तिने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर तिचे फोटो थेट एका पॉर्नोग्राफीक साइटवर व्हायरल झाले होते. धर्मा प्रॉडक्शन्सच्या युट्यूब चॅनलवर जान्हवीचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये जान्हवी म्हणाली, “मीडियाकडून माझा पहिल्यांदा सेक्शुअलाइज्ड केलं गेलं होतं. त्यावेळी मी फक्त 12-13 वर्षांची होती. माझ्या आई-वडिलांसोबत मी एका कार्यक्रमात गेली होती आणि माझे फोटो ऑनलाइन व्हायरल झाले होते. त्यावेळी इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर हे सर्व खूप नवीनच होतं आणि मला माझे फोटो एका पॉर्नोग्राफीक साइटवर दिसले. माझ्या शाळेतील मुलं ते फोटो पाहून माझ्यावर हसत होते. मी ही गोष्ट पुन्हा सांगतेय कारण मला असं वाटतं की माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल मला दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. मला त्यावर मात करणं आवश्यक आहे. मला खात्री आहे की इतर लोक या गोष्टीला वेगळ्या अर्थाने सामोरं जातील. परंतु अधिक वास्तविक आणि खरोखर भयानक अर्थाने सामोरं जातील.”
“मला ठराविक पद्धतीने कपडे परिधान करणं आणि तयार होणं आवडतं. कारण मी एका अशा घरात लहानाची मोठी झाली, जिथे मला ते स्वातंत्र्य मिळालं आहे. माझे कुटुंबीय माझ्याबद्दल ठराविक मतं बनवत नाहीत. पण मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की जेव्हा एखादी मुलगी ठराविक पद्धतीचे कपडे परिधान करते, तेव्हा तिच्या चारित्र्यावर सर्वांत आधी कमेंट केली जाते”, अशा शब्दांत तिने तिचं मत मांडलं. जान्हवी सध्या तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यामध्ये ती अभिनेता राजकुमार रावसोबत मुख्य भूमिका साकारतेय. हा चित्रपट येत्या 31 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.