मुंबई : बॉलिवूडची चांदनी अर्थात अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी सर्वांसाठीच धक्कादायक होती. दुबईला एका लग्नासाठी गेल्या असता बाथटबमध्ये बुडून त्यांचा निधन झालं होतं. आईच्या निधनानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर पूर्णपणे खचली होती. त्यावेळी जान्हवी तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली होती. ‘धडक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच श्रीदेवी यांचं निधन झालं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी तिच्या आईच्या निधनाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. त्या दु:खातून ती कशी सावरली आणि त्यावेळी तिच्या मनात कोणत्या भावना होत्या, याबद्दल जान्हवीने सांगितलं.
“जेव्हा मी माझ्या आईला गमावलं, तेव्हा माझ्या हृदयात जणू एक मोठं छिद्रच पडलं होतं. माझ्यासाठी ती अत्यंत दु:खद घटना होती. पण त्याचवेळी मला माझ्या आयुष्यात ज्या सर्व गोष्टी सहज मिळाल्या, ज्याविषयी मी आतापर्यंत ऐकत आले होते, त्या सर्वांची भरपाई म्हणून माझ्यासोबत काहीतरी वाईट गोष्ट घडली आहे, ही एक भयंकर भावना माझ्या मनात होती. त्यावेळी मी विचार केला की, ठीक आहे.. काहीतरी खूप वाईट घटना घडली आहे आणि मी याच लायकीची आहे. माझ्यासोबत अशी भयंकर घटना घडावी, याच्याच मी लायकीची आहे, असं मला वाटत होतं. ती एक विचित्र मुक्ततेची भावना होती”, असं जान्हवी म्हणाली.
“कॅमेराजवळ राहून काम करणं म्हणजे मी माझ्या आईच्या जवळच आहे, असं मला वाटतं. कारण ती मला नेहमीच म्हणायची की, तुझ्या पहिल्या चित्रपटात तू सर्वोत्कृष्ट शॉट दे. तिच्यासोबत झालेला माझा अखेरचा संवादसुद्धा माझ्या पहिल्या चित्रपटाविषयीच होता,” असं तिने सांगितलं.
“आई गेल्याचा महिना माझ्यासाठी अत्यंत धूसर आहे आणि त्यानंतरचा बराच काळसुद्धा माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट नाही. त्यातलं मला काही आठवेल असं वाटत नाही”, असंही जान्हवी म्हणाली.
श्रीदेवी यांचं निधन 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत झालं. त्या 54 वर्षांच्या होत्या. भाचा मोहीत मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी त्या दुबईला गेल्या होत्या. 80च्या दशकांत जेव्हा चित्रपट केवळ अभिनेत्याच्या जोरावर चालायचे, तेव्हा श्रीदेवी या एकमेव अभिनेत्री होत्या, ज्यांनी बड्या कलाकारांना टक्कर दिली. श्रीदेवी यांच्या नावाने प्रेक्षक स्वतः चित्रपटगृहांकडे ओढले जायचे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर एक असं स्थान निर्माण केलं, जे त्या काळात अभिनेत्रीसाठी बॉलिवूडमध्ये असणं फार कठीण होतं.