मुंबई- नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला. पती बोनी कपूरने सिगारेटचं व्यसन सोडावं, यासाठी त्यांनी स्वत:च्याही तब्येतीकडे दुर्लक्ष केलं होतं, असं तिने सांगितलं. एकेकाळी बोनी कपूर (Boney Kapoor) हे सिगारेटच्या खूप आहारी गेले होते. त्यांची ही सवय सोडवण्यासाठी श्रीदेवी आणि मोठी बहीण खुशीसोबत मिळून जान्हवीनेही कोणती युक्ती लढवली होती, हेसुद्धा तिने या मुलाखतीत सांगितलं.
पिंकविला या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली, “हा खूप जुना किस्सा आहे, जेव्हा आम्ही जुहू इथल्या घरात राहत होतो. पप्पांना त्यावेळी सिगारेटचं खूप व्यसन होतं. मला वाटतं ‘नो एण्ट्री’, ‘वाँटेड’ यांसारख्या चित्रपटाचा तो जमाना होता. दररोज सकाळी मी आणि खुशी मिळून पप्पांच्या सिगारेट्सची विल्हेवाट कशी लावायची, याचा विचार करायचो. आम्ही अनेकदा त्यांचे सिगारेट्स कापले, तोडले, तर कधी त्यात टुथपेस्ट लावली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आईसुद्धा त्यांच्याशी या गोष्टीवरून भांडायची.”
“वडिलांनी सिगारेटचं व्यसन सोडावं यासाठी आई शाकाहारी झाली होती. जोपर्यंत तुम्ही सिगारेटचं व्यसन सोडणार नाही, तोपर्यंत मी मांसाहार खाणार नाही, असं तिने ठामपणे सांगितलं. होतं. पण त्यावेळी डॉक्टरांनी तिला मांसाहार खाण्याचा सल्ला दिला होता. आईची तब्येत त्यावेळी ठीक नव्हती. पप्पासुद्धा तिला मांसाहार खाण्याची विनंती करायचे. अखेर आता चार-पाच वर्षांपूर्वी त्यांनी सिगारेटचं व्यसन सोडलं. मी तेव्हा ते करू शकलो नव्हतो, पण आता करीन, असं पप्पा म्हणाले,” असं जान्हवीने सांगितलं.
श्रीदेवी यांचं 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत निधन झालं. बोनी कपूर यांचा पुतणा मोहित मारवाच्या लग्नासाठी त्या दुबईला गेल्या होत्या.