प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचं खासगी आयुष्य अनेकदा चर्चेत आलं. जावेद अख्तर यांनी 1972 मध्ये हनी इराणी यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 13 वर्षांनंतर ते विभक्त झाले आणि 1984 मध्ये त्यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी दुसरं लग्न केलं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अँग्री यंग मेन’ या डॉक्यु सीरिजमध्ये हनी पहिल्यांदाच झळकल्या आणि त्यात त्यांनी अपयशी ठरलेल्या लग्नाविषयी मत मांडलं. तीन भागाच्या या सीरिजमध्ये जावेद यांनी त्यांच्या पहिल्या लग्नाच्या अपयशासाठी स्वत:ला 60-70 टक्के जबाबदार ठरवलंय. तर हनी इराणी या शबाना यांना स्वीकारण्याबाबत आणि जावेद अख्तर यांच्यासोबतच्या नात्याबाबत मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत.
“मला असं वाटतं की जे घडायचं होतं ते घडलं. पण एक गोष्ट मी नक्कीच म्हणू शकते की आम्ही अजूनही खूप चांगले मित्र आहोत. मला असं वाटतं की आम्ही आता एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो आहोत. मला जेव्हा कधी गरज असेल तेव्हा ते माझ्या मदतीला धावून येतील आणि त्यांना कधी गरज असेल तेव्हा मी त्यांच्यासाठी धावून जाईन. फरहान आणि झोया ही मुलंसुद्धा सोबत आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी खूप चांगल्याप्रकारे जुळवून घेतलंय. शबानासुद्धा खूप चांगली आहे”, असं हनी इराणी म्हणाल्या.
या डॉक्यु सीरिजमध्ये शबाना आझमी यांनीसुद्धा नात्याबद्दल त्यांचं मत मांडलंय. शबाना यांनी जावेद अख्तर यांचा संसार मोडल्याचा आरोप त्यावेळी अनेकांनी केला होता. त्यावर त्या म्हणाल्या, “कोणत्याही नात्यात, विशेषकरून त्रिकोणी नात्यात प्रत्येक गोष्ट खूप खासगी आणि वेदनादायी असते. खासकरून जेव्हा त्यात मुलंबाळंही सहभाग असतात तेव्हा ते अधिक त्रासदायक असतं. कारण अशा विषयांवर लोक लगेच त्यांची मतं मांडण्यास मोकळी असतात. ती घर फोडणारी आहे, ती संसार मोडणारी आहे, असा टॅग लोकांकडून मिळतो.”
शबाना यांनी सांगितलं की त्यांना त्यांची बाजू समजावून सांगायची होती पण अखेर त्यांनी मौन बाळगून सर्व टीका सहन करण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “अर्थातच मला माझी बाजू स्पष्ट करायची होती. पण जर मी असं केलं असतं तर मी खूप लोकांना दुखावलं असतं. त्यामुळे मौन बाळगण्यातच सर्वांचं भलं आहे असं समजून मी काहीच स्पष्टीकरण दिलं नाही.”
यावेळी शबाना यांनी हनी इराणी यांचंही कौतुक केलं. फरहान आणि झोया या मुलांना माझ्याविरोधात तिने कधीच भडकावलं नाही, असं त्यांनी म्हटलंय. “मी हनीला याचं संपूर्ण श्रेय देईन कारण ती तिच्या मुलांना माझ्याविरोधात बरंच काही सांगू शकली असती. पण तिने असं कधीच केलं नाही. उलट त्यांनी मला वाईट सावत्र आई समजू नये म्हणून तिने त्यांना समजावलं होतं. आम्हा दोघींमध्ये खूप चांगलं नातं आहे”, असं त्या म्हणाल्या.