‘लग्न-बिग्न तर बेकारचं काम..’; शबाना यांच्यासोबतच्या नात्यावर जावेद अख्तर असं का म्हणाले?

| Updated on: Nov 24, 2024 | 11:50 AM

प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचं खासगी आयुष्य अनेकदा चर्चेत आलं. जावेद अख्तर यांनी 1972 मध्ये हनी इराणी यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 13 वर्षांनंतर ते विभक्त झाले आणि 1984 मध्ये त्यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी दुसरं लग्न केलं.

लग्न-बिग्न तर बेकारचं काम..; शबाना यांच्यासोबतच्या नात्यावर जावेद अख्तर असं का म्हणाले?
Javed Akhtar and Shabana Azmi
Image Credit source: Instagram
Follow us on

ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबतच्या लग्नाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. लग्नसंस्थेकडे फारसं गांभीर्याने पाहत नसल्याचं म्हणतानाच जावेद यांनी नमूद केलं की प्रत्येक नात्याचा गाभा हा एकमेकांविषयी असलेला आदर असतो. ते म्हणाले की लग्न ही संकल्पना इतकी जुनी आहे की त्यावर गेल्या काही वर्षांत बराच कचरा जमा झाला आहे. यावेळी स्वत:च्या नात्याचं उदाहरण देताना त्यांनी स्पष्ट केलं की शबानासोबत त्यांचं नातं केवळ विवाहित जोडप्याचं नाही तर मैत्रीचं अधिक आहे. या दोघांनी 1984 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. त्यावेळी जावेद हे पहिली पत्नी हनी इराणीशी विवाहित होते.

बरखा दत्त यांच्या ‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या मुलाखतीत जावेद यांना शबाना यांच्यासोबतच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “खरं सांगायचं झाल्यास, आम्ही विवाहित जोडपं म्हणून कमी आणि मित्र म्हणून जास्त वावरतो. चांगल्या लग्नासाठी माझी एकमेव पात्रता हीच आहे की तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहात की नाहीत? लग्न-बिग्न तर बेकारचं काम आहे. ही खूप शतकं जुनी परंपरा आहे. हे एका दगडासारखं हे जे शतकांपासून पर्वतावरून घरंगळत खाली येतंय. विशेष म्हणजे हे दगड खाली घरंगळत येताना, आपल्यासोबत खूप कचरा, घाण घेऊन येतंय.”

हे सुद्धा वाचा

“पत्नी आणि पती या दोन्ही शब्दांचे अनेक भिन्न अर्थ निर्माण झाले आहेत. तुम्ही हे सर्व विसरून जात. मला सांगा दोन व्यक्ती, त्यांचं लिंग काहीही असो, ते एकत्र आनंदाने कसे राहू शकतात? त्यासाठी परस्पर आदराची गरज आहे. त्यासाठी एकमेकांचा विचार करण्याची गरज आहे, एकमेकांना मोकळं वातावरण देण्याची गरज आहे. लोकांनी हे समजणं खूप महत्त्वाचं आहे की त्यांचा जोडीदार हा जोडीदाराशिवाय स्वत: एक स्वतंत्र व्यक्ती आहे. ती व्यक्तीसुद्धा माणूस आहे आणि त्या व्यक्तीचेही स्वप्न, ध्येय आहेत, हे समजून घ्यायला हवं. तुमचा स्वत:च्या ध्येयावर जेवढा हक्क असतो, तेवढाच त्यांचा त्यांच्या ध्येयावर असतो. इतकंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ही काही फार मोठी गोष्ट नाही. उलट हे समजून घेणं खूप सोपं आहे. जर तुम्ही दोघं खुश असाल तरच तुम्ही एकत्र खुश राहू शकता”, असं ते पुढे म्हणाले.

आदराशिवाय असलेलं प्रेम म्हणजे फसवणूक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. “एक स्वतंत्र स्त्री, जिच्या स्वत:च्या महत्त्वाकांक्षा, स्वत:चा व्यवसाय, स्वत:ची मतं असतात, ती फार सोयीची व्यक्ती मानली जात नाही. साहजिकच तुमच्यासोबत राहणारी आणि तुमचा गुलाम नसलेली व्यक्ती गैरसोयीची वाटू शकते. पण ते तुमचे गुलाम नाहीत हे समजून घ्यायला हवं”, असं मत अख्तर यांनी यावेळी मांडलं.