मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘पठाण’नंतर हा त्याचा दुसरा असा चित्रपट आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे आणि अनेक विक्रम मोडले आहेत. ‘जवान’ने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करत नवा विक्रम रचला होता. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सात दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या सात दिवसांत शाहरुखच्या ‘जवान’ने कमाईचा 350 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. लवकरच कमाईचा आकडा 400 आणि 500 कोटींचाही टप्पा पार करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक व्यक्त करत आहेत.
किंग खानच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास, बॉक्स ऑफिस ट्रॅकर साल्कनिल्कनुसार जवळपास 23.3 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. मात्र हा आकडा या आठवड्यातील सर्वांत कमी आहे. सातव्या दिवसाअखेर जवानच्या कमाईचा आकडा 368.38 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर जगभरात या चित्रपटाने 621 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
पहिला दिवस- 75 कोटी रुपये
दुसरा दिवस- 53.23 कोटी रुपये
तिसरा दिवस- 77.83 कोटी रुपये
चौथा दिवस- 80.01 कोटी रुपये
पाचवा दिवस- 32.92 कोटी रुपये
सहावा दिवस- 26 कोटी रुपये
सुरुवातीला ‘जवान’ची कमाई सुसाट झाली असली तरी पहिल्या वीकेंडनंतर कमाईत घट झाल्याचं पहायला मिळालं. मात्र दुसऱ्या वीकेंडला कमाईत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात लवकरच ‘जवान’ 400 कोटींचा टप्पा पार करू शकेल. शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाला समिक्षकांनी चार ते पाच स्टार्स रेटिंग दिले आहेत. किंग खानसोबतच या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज आहे. नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, एजाज खान, सुनील ग्रोवर, गिरीजा ओक, लहर खान, संजीता चॅटर्जी यांच्याही भूमिका आहेत.
दक्षिण भारतातही शाहरुखच्या ‘जवान’ची क्रेझ पहायला मिळत आहे. शाहरुखने स्वत:च्याच चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘जवान’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.