मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ या चित्रपटाचा प्रीव्ह्यू व्हिडीओ सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. दाक्षिणात्य दिग्दर्शक अटलीने पहिल्यांदाच या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जवळपास दशकभरानंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर खलनायकी छटा असलेली भूमिका साकारत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. ॲक्शन सीन्सचा भरणा असलेल्या या प्रीव्ह्यू व्हिडीओला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून अवघ्या 24 तासांत त्याने नवा विक्रम रचला आहे. 24 तासांच्या आत या व्हिडीओला एक कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. असा बंपर प्रतिसाद याआधी कोणत्याच हिंदी चित्रपटाला मिळाला नाही.
युट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सर्व प्लॅटफॉर्म्सवर ‘जवान’च्या प्रीव्ह्यूला 1 कोटी 12 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. फक्त हिंदी भाषेतील व्हिडीओला युट्यूबवर तब्बल 47 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. एवढ्या कमी वेळात इतके व्ह्यूज कोणत्याच चित्रपटाच्या ट्रेलरला मिळाले नव्हते. या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, दीपिका पदुकोण, विजय सेतुपती, रिधी डोग्रा, सान्या मल्होत्रा, संजीता भट्टाचार्य आणि गिरीजा ओक यांच्याही भूमिका आहेत. इतकंच नव्हे तर थलपती विजय आणि संजय दत्त हेसुद्धा यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं कळतंय.
‘जवान’च्या प्रीव्ह्यूमध्ये एकापेक्षा एक दमदार ॲक्शन सीन्स पहायला मिळत आहेत. फक्त शाहरुखच नाही तर नयनतारा आणि दीपिकासुद्धा ॲक्शन सीन्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील सीन्सची सिनेमॅटोग्राफी विशेष लक्ष वेधून घेते. त्याचप्रमाणे यामध्ये किंग खानचे चार वेगवेगळे लूक पहायला मिळतात. प्रीव्ह्यूची सुरुवातच शाहरुखच्या आवाजाने होते. दमदार ॲक्शन सीन्ससोबतच ‘बेकरार करके’ हे रेट्रो गाणंसुद्धा यामध्ये ऐकायला मिळतं.
दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अटलीने ‘जवान’चं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात ग्रॅमी पुरस्कार नामांकित आणि लोकप्रिय कलाकार राजा कुमारी यांचा ‘द किंग खान रॅप’सुद्धा समाविष्ट आहे. त्याची झलकसुद्धा या प्रीव्ह्यूमध्ये पहायला मिळते. जवान या चित्रपटाची निर्मिती शाहरुखची पत्नी गौरी खान आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंटने केली आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.