मुंबई : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने जवळपास चार वर्षांनंतर ‘पठाण’ या चित्रपटातून पुनरागमन केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला. त्यानंतर आता त्याच्या आगामी चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाचा प्रीव्हू व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन मिनिटं 12 सेकंदांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाच्या या प्रीव्ह्यू व्हिडीओमध्ये ॲक्शनचा जोरदार धमाका पहायला मिळतोय. शाहरुखसोबत यामध्ये नयनतारा आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्याही भूमिकांची झलक पहायला मिळाली.
‘जवान’च्या प्रीव्ह्यूमध्ये एकापेक्षा एक दमदार ॲक्शन सीन्स पहायला मिळत आहेत. फक्त शाहरुखच नाही तर नयनतारा आणि दीपिकासुद्धा अॅक्शन सीन्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील सीन्सची सिनेमॅटोग्राफी विशेष लक्ष वेधून घेते. त्याचप्रमाणे यामध्ये किंग खानचे चार वेगवेगळे लूक पहायला मिळतात. प्रीव्ह्यूची सुरुवातच शाहरुखच्या आवाजाने होते. दमदार अॅक्शन सीन्ससोबतच ‘बेकरार करके’ हे रेट्रो गाणंसुद्धा यामध्ये ऐकायला मिळतं.
दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अटलीने ‘जवान’चं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात ग्रॅमी पुरस्कार नामांकित आणि लोकप्रिय कलाकार राजा कुमारी यांचा ‘द किंग खान रॅप’सुद्धा समाविष्ट आहे. त्याची झलकसुद्धा या प्रीव्ह्यूमध्ये पहायला मिळते. शाहरुख खान, नयनतारा आणि दीपिका पदुकोणसोबतच यामध्ये साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याशिवाय सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिधी डोग्रा, सुनील ग्रोवर आणि मुकेश छाब्रा अशी कलाकारांची मोठी फौजच आहे.
जवान या चित्रपटाची निर्मिती शाहरुखची पत्नी गौरी खान आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंटने केली आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘जवान’ या चित्रपटाशिवाय शाहरुखच्या ‘डंकी’चीही प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुखसोबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी काम करत आहेत. हा चित्रपट ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. डंकी या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच 155 कोटी रुपये कमावल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटाचे ओटीटी हक्क मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सच्या जियो सिनेमाला इतक्या मोठ्या रकमेला विकले गेले आहेत. फक्त हिंदी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटांमध्ये ही आता पर्यंतची सर्वात मोठी डील असल्याचं म्हटलं जातंय.