मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानच्या ज्या चित्रपटाची जोरदार चर्चा होती, अखेर आज (गुरुवार) त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘जवान’ या चित्रपटाचा जवळपास तीन मिनिटांचा ट्रेलर पाहून नेटकरी त्याच्या हिट होण्याची गॅरंटी देत आहेत. ॲक्शन, ड्रामा, थ्रिल या सर्व गोष्टींचा भरणा या ट्रेलरमध्ये पहायला मिळतोय. या ट्रेलरमधल्या शाहरुखच्या एका डायलॉगने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. नेटकरी या डायलॉगचं कनेक्शन एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याशी जोडत आहेत. त्यामुळे शाहरुखने त्याच्या या चित्रपटाच्या माध्यमातून मुलगा आर्यन खानसोबत घडलेल्या घटनेचा सूड घेतोय का, असाही सवाल काहींनी केला आहे.
‘जवान’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या अखेरीस शाहरुखचा एक डायलॉग आहे. त्यात तो म्हणतो, “बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर.” शाहरुखचा हाच डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शाहरुखने या डायलॉगद्वारे समीर वानखेडेंना टोला लगावला आहे, असं नेटकरी म्हणत आहेत. ट्विटरवरही हाच डायलॉग ट्रेंड होत आहे. समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती.
2021 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी केली होती. या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केली जात असल्याचा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. या छापेमारीत शाहरुख खानचा मुलगा आर्यनलाही अटक झाली होती. त्यावेळी समीर वानखेडे हेच मुंबई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक होते. आर्यन खान याप्रकरणी जवळपास महिनाभर तुरुंगात होता. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका झाली.
याप्रकरणात नंतर समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचा आरोप झाला. आर्यन खानच्या कुटुंबीयांकडून त्यांनी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याशिवाय काही व्हॉट्स ॲप चॅट्ससुद्धा लीक झाले होते. ज्यामध्ये शाहरुख आणि वानखेडे यांच्यातील आर्यनबद्दल झालेला संवाद होता. नंतर समीर वानखेडे यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं आणि त्यांची बदली चेन्नईला झाली. दुसरीकडे आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लिन चिट मिळाली. याच वर्षी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. पदाचा दुरुपयोग करणे, लाच मागणे असे आरोप त्यांच्यावर झाले.