अमिताभ यांचं नाव ऐकून पुन्हा चिडल्या जया बच्चन; उपराष्ट्रपतींनी घेतली शाळा

| Updated on: Aug 06, 2024 | 10:09 AM

याआधी जेव्हा जया बच्चन यांचा उल्लेख ‘जया अमिताभ बच्चन’ असा करण्यात आला, तेव्हा त्यांनी त्यावरून नाराजी व्यक्त केली होती. “हे काहीतरी नवीन आहे की, स्त्रिया त्यांच्या पतीच्या नावाने ओळखल्या जातील. जसं की त्यांचं स्वत:चं अस्तित्व किंवा कर्तृत्वच नाही”, असं त्यांनी बोलून दाखवलं होतं.

अमिताभ यांचं नाव ऐकून पुन्हा चिडल्या जया बच्चन; उपराष्ट्रपतींनी घेतली शाळा
Image Credit source: ANI
Follow us on

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावावरून चर्चेत आहेत. राज्यसभेत त्यांच्या नावासोबत पती अमिताभ बच्चन यांचं नाव घेतल्याने त्यांनी आधी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांनी स्वत:च ‘जया अमिताभ बच्चन’ असं नाव सभागृहात घेतलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या नावासोबत अमिताभ यांचं नाव जोडल्याने आक्षेप घेतला आहे. त्यावर आता राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी थेट त्यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे.

नेमकं काय घडलं?

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि राज्यसभेत सोमवारी यावर चर्चा सुरू होती. मात्र जेव्हा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी जया बच्चन यांचं नाव घेतलं, तेव्हा पुन्हा त्यांनी त्यावरून आक्षेप घेतला. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर हे 100 स्मार्ट सिटीच्या विषयावर चर्चा करत होते. जसं त्यांनी आपलं भाषण संपवलं, तसं अध्यक्षांनी जया बच्चन यांचं नाव घेत म्हटलं, ‘श्री जया अमिताभ बच्चन..’ आणि हे ऐकून जया यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली. त्या धनखड यांना म्हणाल्या, “तुम्हाला अमिताभ या शब्दाचा अर्थ माहीत आहे का?” त्यावर धनखड म्हणतात, “तुम्ही बदलून टाका, मी नाव बदलून टाकेन. माननीय सदस्य, जे नाव इलेक्शन सर्टिफिकेटमध्ये येतं आणि इथे जमा होतं, त्यात तुम्ही बदल करू शकता. या प्रक्रियेचा लाभ मी स्वत: घेतला आहे. 1989 मध्ये मी त्याचा लाभ घेतला आणि ती नाव बदलण्याची प्रक्रिया आम्ही प्रत्येक सदस्याला दिली आहे.”

हे सुद्धा वाचा

धनखड यांचा सल्ला ऐकून जया पुढे म्हणतात, “मला माझ्या नावावर आणि माझ्या पतीच्या नावावर खूप अभिमान आहे. मला त्यांच्या कामावर खूप अभिमान आहे. त्यांच्या नावाचा अर्थ आहे, ‘आभा, जो कधीच मिटू शकत नाही.'” यानंतर जया बच्चन म्हणतात, “हा ड्रामा तुम्ही लोकांनी नवीन सुरू केला आहे. आधी असं नव्हतं.”

नावावरून चर्चा

यानंतर अध्यक्ष सांगतात की ते एकदा फ्रान्सला गेले होते आणि तिथे एका हॉटेलमध्ये त्यांना सांगितलं गेलं की तिथे प्रत्येक ग्लोबल आयकॉनचा फोटो आहे. त्यात अमिताभ बच्चन यांचाही फोटो होता. धनखड म्हणाले की ही 2004 ची गोष्ट आहे आणि अमिताभ बच्चन यांच्यावर संपूर्ण देशाला खूप अभिमान आहे. यानंतर जेव्हा अध्यक्ष मनोहर लाल खट्टर यांचं नाव घेतात तेव्हा लगेच जया बच्चन म्हणतात की, “त्यांच्या नावापुढे त्यांच्या पत्नीचं नाव लावा. सर मी याविरोधात नाही, पण हे चुकीचं आहे.” याचं उत्तर देताना अध्यक्ष म्हणतात की “मी अनेकदा माझा उल्लेख डॉ. सुदेश यांचे पती असा केला आहे. सुदेश माझ्या पत्नीचं नाव आहे.” हे ऐकल्यानंतर जया बच्चन त्यांची माफी मागतात आणि म्हणतात, “माफ करा सर, मला हे माहीत नव्हतं.” जया बच्चन यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. जर पतीचं नाव जोडलेलं आवडत नसेल तर त्यांनी नाव बदलून घ्यावं, असा सल्ला नेटकऱ्यांनीही दिला आहे.