“मी तर कधीच बघणार नाही”; जया बच्चन यांनी अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटाची उडवली खिल्ली

| Updated on: Mar 20, 2025 | 10:32 AM

ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन या नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी अक्षय कुमारच्या चित्रपटाची खिल्ली उडवली. या चित्रपटाला त्यांनी थेट फ्लॉप असं म्हटलंय.

मी तर कधीच बघणार नाही; जया बच्चन यांनी अक्षय कुमारच्या या चित्रपटाची उडवली खिल्ली
Akshay Kumar and Jaya Bachchan
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आजवरच्या करिअरमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या चित्रपटांची निवडसुद्धा इतर कलाकारांपेक्षा वेगळी आहे. अशाच एका अनोख्या कथानकावरील त्याला चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नाव होतं ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’. भारतातील उघड्यावर शौचालयाला बसण्याच्या समस्येवर भाष्य करणारा हा चित्रपट होता. यामध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेत्री भूमिका पेडणेकरने मुख्य भूमिका साकारली होती. आता त्याच चित्रपटाबाबत ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. असं शीर्षक असलेला चित्रपट मी कधीच बघायला जाणार नाही, असं त्या थेट म्हणाल्या.

इंडिया टीव्हीकडून नुकतंच एका कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्क्लेव्हमध्ये जया बच्चन यांना ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या सरकारी मोहिमेवरील आधारित चित्रपटाबाबतत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, “आता तुम्ही नावंच पहा कसं आहे, मी स्वत: असा चित्रपट कधी पहायला जाणार नाही. टॉयलेट: एक प्रेम कथा हे काही नाव आहे का? असं शीर्षक असतं का?” इतकंच नव्हे तर त्यांनी अक्षय कुमारच्या या चित्रपटाला फ्लॉप असंही म्हटलंय. असं विचित्र शीर्षक असलेला चित्रपट तुम्ही पहायला जाणार का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. त्यानंतर प्रेक्षकांमधून काहींनी हात उंचावल्यावर जया म्हणाल्या, “इतक्या लोकांमधून फक्त चार जणांना हा चित्रपट पाहावासा वाटतोय. हे खूप दु:खद आहे. हा तर फ्लॉप चित्रपट आहे.”

‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ हा चित्रपट 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. भारतात या चित्रपटाने 135 कोटी रुपये तर जगभरात 315 कोटी रुपये कमावले होते. श्री नारायण सिंह दिग्दर्शित या चित्रपटात दिव्येंदु, अनुपम खेर, सुधीर पांडे, राजेश शर्मा, आयेशा रजा मिश्रा आणि शुभा खोटे यांच्याही भूमिका होत्या.

हे सुद्धा वाचा

जया बच्चन या करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकल्या होत्या. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाने जगभरात 350 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. यामध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्याही भूमिका होत्या.