मुंबई : 15 मार्च 2024 | अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदा हिने करिअरचा अत्यंत वेगळा मार्ग निवडला. ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टद्वारे तिची एक नवी ओळख तरुणाईमध्ये निर्माण होत आहे. या पॉडकास्ट मुलाखतीत ती तिच्या कुटुंबीयांना आमंत्रित करते आणि त्यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर मोकळेपणे गप्पा मारते. आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन यांनी आतापर्यंत या पॉडकास्टमध्ये आपली मतं बेधडकपणे मांडली आहेत. त्याचसोबत जया बच्चन यांनी कुटुंबातील काही किस्सेसुद्धा सांगितले आहेत. या पॉडकास्टच्या नव्या एपिसोडमध्ये श्वेता, नव्या आणि जया या तिघी अपयश हाताळण्याबाबत आणि आव्हानांचा सामना करण्याबाबत व्यक्त झाल्या. यावेळी जया बच्चन या पहिल्यांदाच पती अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी बोलल्या. 1990 मध्ये बिग बींना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं.
प्रतिकूल परिस्थितीतील अनुभवांची आठवण करत जया यांनी कठीण काळात आपल्या जवळच्या व्यक्तींना शांततेने पाठिंबा देण्याचा सल्ला दिला. जेव्हा बिग बींच्या करिअरमध्ये तो कठीण काळ आला, तेव्हा त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिल्याचं जया बच्चन यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, “आम्ही आयुष्याच्या विविध टप्प्यांवर विविध अपयशांना सामोरं गेलो. जेव्हा एखादा पुरुष कठीण काळातून जात असतो, तेव्हा त्यांच्यासोबत फक्त शांतपणे उभं राहावं. तुमचं सोबत असणंच खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्या बाजूने शांत उभं राहून आपण फक्त इतकंच म्हणायचं असतं की मी तुमच्यासोबत आहे.” मात्र आईचा हा सल्ला मुलगी श्वेता बच्चनला पटत नाही. ती विरोध करत म्हणते, “मी या मताशी सहमत नाही. कधीकधी पुरुषांना काही कल्पनांची गरज असते. त्यामुळे कठीण काळात फक्त शांत उभं राहण्यापेक्षा सक्रिय होऊन मला त्यांची मदत करायला आवडेल.”
1990 मध्ये अमिताभ बच्चन यांनी अनेक आव्हानांचा सामना केला होता. त्यांची कंपनी दिवाळखोरीत गेली होती. यामुळे बिग बींच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं. विर संघवी यांना दिलेल्या मुलाखतीत बिग बी त्या परिस्थितीच्या गंभीरतेविषयी व्यक्त झाले होते. “जवळपास 90 कोटींचं कर्ज होतं आणि त्यामुळे सर्व मालमत्ता जप्त झाली होती. कर्जाची परतफेड मागण्यासाठी घरासमोर दररोज लोक यायचे. ते सर्व अत्यंत अपमानास्पद आणि लाजिरवाणं होतं”, असं त्यांनी सांगितलं होतं. यश चोप्रा यांनी जेव्हा त्यांना ‘मोहब्बतें’मधील भूमिकेची ऑफर दिली, तेव्हापासून बिग बींचं करिअर पुन्हा रुळावर येऊ लागलं होतं. त्याचसोबत त्यांच्या यशात ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा मोलाचा वाटा आहे.