अभिनेते जितेंद्र आणि रेखा यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर लोकांना आवडलीच, पण त्यांची ऑफस्क्रीन मैत्रीसुद्धा चांगलीच चर्चेत राहिली. या दोघांनी ‘एक बेचारा’ (1972), ‘अनोखी अदा’ (1973), ‘संतान’ (1972), ‘कर्मयोगी’ (1978), ‘जुदाई’ (1980), ‘जल महाल’ (1980), ‘मांग भरो सजना’ (1980), ‘मेहंदी रंग लाएगी’ (1982), ‘मेरा पती सिर्फ मेरा है’ (1990) आणि ‘शेषनाग’ (1990) यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. पडद्यामागेही या दोघांमध्ये खास मैत्री झाली होती. यावर्षी आपल्या सत्तराव्या वाढदिवशी जितेंद्र यांनी रेखा यांच्यासोबतचा एक खास किस्सा सांगितला. एका इन्कम टॅक्स प्रकरणात अडकल्यानंतर रेखा यांनी त्यांची कशाप्रकारे मदत केली होती, याविषयी त्यांनी सांगितलं.
‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र म्हणाले की त्यांच्या चार्टर्ड अकाऊंटंटने एक समस्या हेरली होती. संबंधित अधिकारी हा रेखा यांचा खूप मोठा चाहता होता. त्यामुळे रेखा यांच्याशी भेट झाली तर नक्कीच तो भारावून जाणार होता. ही गोष्ट जितेंद्र यांना समजली आणि त्यांनी रेखा यांना फोन केला. रेखा यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली तेव्हा त्या लगेच मदत करायला तयार झाल्या होत्या.
“रेखा लगेचच माझ्या मदतीला धावून आली होती. इतकंच नव्हे तर तिने स्वत:च्या हाताने त्यांना नाश्ता दिला होता. यामुळे संबंधित अधिकारी खुश झाला आणि माझी इन्कम टॅक्सची समस्या सोडवली गेली. तुम्हीच मला सांगा की इतकी मदत कोण करतं? खरा मित्रच तुमच्यासाठी हे करू शकतो. अशी अनेक उदाहरणं आहेत, जेव्हा ती माझ्या बाजूने अत्यंत खंबीरपणे उभी राहिली होती. रेखा ही माझी ‘जान’ आहे. ती यारों का यार आहे”, अशा शब्दांत जितेंद्र यांनी कौतुकाचा वर्षाव केला.
एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी एकापेक्षा एक दमदार चित्रपटांत भूमिका साकारल्या आबेत. आज त्या मोठ्या पडद्यापासून दूर असल्या तरी सौंदर्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. रेखा यांचे चित्रपट जितके चर्चेत असायचे, तितकीच चर्चा त्यांच्या खासगी आयुष्याविषयी झाली, किंबहुना आजही होते.