मुंबई : 8 मार्च 2024 | टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘झनक’ या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री डॉली सोहीचं शुक्रवारी सकाळी निधन झालं. डॉलीची बहीण अमनदीप सोहीनेही काही तासांपूर्वी गुरुवारी रात्री अखेरचा श्वास घेतला होता. अमनदीपच्या निधनाच्या काही तासांनंतर डॉलीने आपले प्राण सोडले. गेल्या काही महिन्यांपासून डॉली सर्वाइकल कॅन्सरने ग्रस्त होती. तर अमनदीपचं निधन काविळने झाल्याचं कळतंय. अभिनेत्री हिबा नवाब आणि कृषाल अहुजा यांच्या ‘झनक’ या मालिकेत डॉली महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होती. काही दिवसांपूर्वीच तिने मालिकेला रामराम केला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिला कॅन्सरचं निदान झालं होतं. उपचार आणि काम या दोन्ही गोष्टी ती गेल्या काही महिन्यांपासून सांभाळत होती. मात्र आरोग्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने काही दिवसांपूर्वीच मालिका सोडली होती.
“आमच्या लाडक्या डॉलीचं आज सकाळी निधन झालं. हा धक्का पचवणं आमच्यासाठी सोपं नाही. डॉलीच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जातील”, अशी माहिती डॉलीच्या कुटुंबीयांनी दिली. अभिनेत्रीचा भाऊ मनू याने काही तासांपूर्वीच बहीण अमनदीपच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांत डॉलीच्या निधनाची माहिती समोर आली. अमनदीपने गुरुवारी 7 मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला. ‘बदतमीच दिल’ या मालिकेतील भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
अमनदीपच्या निधनानंतर डॉलीला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. म्हणून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर तिच्यात थोडीफार सुधारणादेखील जाणवली होती. मात्र शुक्रवारी सकाळी तिचं निधन झालं. डॉलीने जवळपास दोन दशक टीव्ही इंडस्ट्रीत काम केलंय. तिचं लग्न कॅनडामधील एनआयआर अवनीत धनोवाशी झालं होतं. मात्र आई झाल्यानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही समस्या निर्माण झाल्या होत्या.
काही दिवासंपूर्वी अभिनेत्री पूनम पांडेनं स्वत:च्या मृत्यूविषयी अफवा पसरवली होती. सर्वाइकल कॅन्सरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी पूनम पांडेनं स्वत:च्याच निधनाची अफवा पसरवली होती. त्यावर डॉलीने संताप व्यक्त केला होता. “जे लोक अशा प्रकारच्या कॅन्सरशी झुंज देत आहेत, त्यांना ही गोष्ट पचवणंच खूप कठीण आहे. पूनमच्या निधनाबद्दल वाचलं तेव्हा माझ्या पायाखालची जमिनच सरकली होती”, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या होत्या.