‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील ‘टप्पू’ आणि त्याची ‘टप्पू सेना’ साकारणारे कलाकार बदलले तरी त्यांची प्रसिद्धी काही कमी झाली नाही. यामध्ये अभिनेत्री झील मेहताने 2008 ते 2012 या कालावधीत भिडे मास्तरांची मुलगी सोनू भिडेची भूमिका साकारली होती. शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने मालिकेला रामराम केला होता. आता काही दिवसांपूर्वीच ती लग्नबंधनात अडकली. झीलने मालिका सोडली तरी ती चाहत्यांमध्ये आजसुद्धा सोनू म्हणूनच ओळखली जाते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत झीलने मालिकेतील अत्यंत क्लेशकारत आठवण सांगितली.
झील मेहताने ‘तारक मेहता..’ या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे आणि माधवी भिडे यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. सिद्धेश लोकरेच्या पॉडकास्टमध्ये तिने या मालिकेतील एका सीनचा तिच्या मनावर कसा परिणाम झाला, याविषयी सांगितलं. “तो सीन पाहिल्यानंतर मी विचार करत होते की मी ही मालिका का करतेय”, असं ती म्हणाली. मालिकेच्या एका एपिसोडमध्ये टप्पूचा बालविवाह दाखवण्यात आला होता. हा सीन फक्त मनोरंजनासाठी शूट करण्यात आला असला तरी त्याचा झीलच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. त्यावेळी तिने मालिकेत काम करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला होता.
“टप्पूच्या बालविवाहचा जो एपिसोड होता, तो माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक होता. मी या मालिकेत का काम करतेय, असा प्रश्न मला स्वत:ला पडू लागला होता. त्यात बालविवाहचा सीन शूट करण्यात आला होता. मी काय विचार करत होती याबद्दल मला खात्री नव्हती. जेव्हा मी मालिकेत तो एपिसोड पाहिला, तेव्हा तो फक्त एक स्वप्नाचा सीन होता हे लक्षात आलं. पण त्यावेळी मी माझ्या आयुष्यातील निर्णयांबद्दल साशंक झाले होते. माझ्या डोक्यात बरेच विचार सुरू होते ”
‘तारक मेहता..’च्या एका एपिसोडमध्ये टप्पूचा बालविवाह दाखवण्यात आला होता. पण नंतर जेठालाल तसं स्वप्न पाहतो हे उघड होतं. या सीनदरम्यान ‘बालविवाह चुकीचा आहे, आम्ही त्याला प्रोत्साहन देत नाही’ अशी टीपही मालिकेत दाखवण्यात आली होती. मात्र याच सीनमुळे झीलच्या मनावर आघात झाला होता. झीलने चार वर्षे मालिकेत काम केल्यानंतर शिक्षणासाठी ही भूमिका सोडली. त्यानंतर निधी भानुशालीने मालिकेत तिची जागा घेतली होती.